”सरकार फक्त ठाकरे-पवारांचं नाही, तर महाविकास आघाडीचं”; महाराष्ट्र सरकारला ही आठवण अखेर राहुल गांधींना करून द्यावी लागली

राष्ट्रीय कॉंग्रेसला दुर्लक्षित करून चालणार नाही?; राहुल गांधी तुस्सी ग्रेट हो!

rahul-uddhav-sharad pawar

नागपूर :- तुम्ही त्यांना पप्पू म्हणा किंवा अजून काही. ते हसून बोलतात. म्हणून कदाचित समोरच्यालाही हसायला येत असावे. बडेजाव न करता साधेपणाने गंभीर मुद्दे रेटून सांगण्यातही कदाचित ते कमी पडत असावे. हे सगळे मान्य; पण आजवर त्यांनी ज्या ज्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे त्यातली सत्यता पडताळून न पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात तर त्यांनी काल जी भूमिका घेतली होती त्याला एका बॉलमध्ये सिक्सर ठोकावा असेच म्हणावे लागेल. होय, एका अर्थाने राहुल गांधींनी एका विधानात ठाकरे सरकारचे कान टोचले असेच म्हणावे लागेल.

राहुल गांधींच्या कालच्या विधानानंतर आज लगेच महाविकास आघाडीची आढावा बैठक झाली. एवढेच नव्हे तर आता विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी काल केंद्राने राज्याला किती मदत दिली या दाव्यावर महाविकास आघाडी संयुक्तिक उत्तरदेखील देणार आहे. आजवर कॉंग्रेस राज्यात सत्तेत आहे की नाही असेच चित्र निर्माण झाले होते. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ‘थोरल्या’ भावाची समंजस भूमिका घेऊन मुख्यमंत्री ठाकरेंसोबत रोज माझा संवाद असल्याचे माध्यमांना सांगत असले तरी, प्रत्यक्षात माध्यमांत ते कुठे दिसत नव्हते. त्याउलट पृथ्वीराज चव्हाण यांनीही हे अनेकदा राज्य सरकारच्या लक्षात आणून दिले. अखेर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकाच विधानात महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेससुद्धा आहे याची अप्रत्यक्ष आठवण करून दिली असे दिसून येते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन-तीन महिन्यांत भारतात, राज्यात कोरोनाची साथ आली.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसारच राज्य सरकारे काम करत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे फेसबूकवर लाईव्ह येऊन राज्यातील जनतेला धीर देत आहेत; परंतु आता राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोनाबाधितांमध्ये लक्षणीय वाढ होताना पाहून मुख्यमंत्र्यांच्या संयमी भाषणांचा लोकांना कंटाळा यायला लागला आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षानेही हीच संधी हेरून राज्य सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही होत आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत. यावरून कोरोनाला हाताळण्यासाठी राज्य सरकार कसे अपयशी ठरले हे सिद्ध करून दाखवण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. तसे पाहता विरोधकांना आयती संधीच मिळाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाताना पाहून राज्यपालांना थेट शरद पवारांना बोलावणे पाठवावे लागले. एवढेच नाही तर राज्यपालांच्या भेटीनंतर पवारांनी थेट मातोश्री गाठणे… या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात चर्चाविचर्चांना उधाण आले. याच संधीचा फायदा राहुल गांधींनीही घेतला आणि अखेर त्यांच्या पोटातले ओठावर आले. महाराष्ट्रात आमची सत्ता नाही.

कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा आम्हाला अधिकार नाही असे राहुल गांधी काल बोलल्यानंतर अनेकांना आश्चर्य वाटले; पण कदाचित हे जरुरीच होते. त्यानंतर राहुल गांधी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा फोनवरून संवाद झाला. कोरोनाच्या संकटकाळात आम्ही ठाकरेंसोबत आहोत अशी राहुल गांधींची विधानं माध्यमांसमोर आलीत. राहुल गांधींनी लगेच आपली बाजू बदलली. म्हणजेच, राहुल गांधींना अपेक्षित ते साध्य होणार याची खात्री पटली, असे म्हणण्यास वाव आहे. खरे तर काल राहुल गांधींच्या त्या विधानाचे आश्चर्यच वाटायला नको; कारण महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस मिळून सरकार स्थापन केलेले आहे. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तीन विरोधी पक्ष एकत्र येऊन ही सत्ता आणली आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना राष्ट्रवादीचीच सत्ता असावी, असे चित्र उभे राहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या काही थोड्या बैठका झाल्यात त्या बैठकीत शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याच उपस्थित झाल्या आहेत.

या कोणत्याही बैठकीत कॉंग्रेसचा नेता दिसला नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस पक्ष दुर्लक्षितच दिसून आला. खरे तर कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित विचारविनिमय, सल्लामसलत करून ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. आज जी महाविकास आघाडीची बैठक झाली, अशा हजार बैठका आतापर्यंत व्हायला हव्या होत्या. हे सरकार कोणा एका पक्षाचे नाही तर एका राष्ट्रीय पक्षासोबत मिळून हे सरकार स्थापन झाले आहे हे विसरता कामा नये आणि याचीच आठवण कदाचित राहुल गांधी यांनी काल करून दिली असावी.

तुलना येरेकर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER