काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी घेतला महाराष्ट्रातील कोरोना स्थितीचा आढावा

Sonia Gandhi - Rahul Gandhi - Balasaheb Thorat
  • कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याची केली सूचना

काँग्रेस (Congress) अध्यक्ष  सोनिया गांधी (Sonia Gandhi) व खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज देशातील काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधून राज्यातील कोरोना (Corona) स्थिती व लसीकरण (Vaccination) मोहिमेचा आढावा घेऊन कोरोना नियंत्रण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना केल्या.

काँग्रेसशासित राज्यांसोबत केंद्र सरकार (Central Government) दुजाभाव करत असून कोरोना प्रतिबंधक लस, टेस्टिंग किट, रेमडिसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा व इतर आवश्यक उपकरणांच्या वाटपात मोठ्या प्रमाणात असमतोल दिसून येत आहे. आरोग्य उपकरणांच्या वितरणात केंद्र सरकारने अधिक पारदर्शकता बाळगावी व राज्यांना पुरेशा प्रमाणात लस व इतर वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी व विधिमंडळ पक्षनेत्यांनी यावेळी मांडल्या.

या बैठकीला मार्गदर्शन करताना खा. राहुल गांधी म्हणाले की, कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व पावले काँग्रेसशासित राज्यांनी उचलली पाहिजेत; पण त्याचा गरीब जनतेच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना संसर्गाचा सर्वांत जास्त दुष्परिणाम सर्वसामान्य व गरिबांच्या जीवनावर होतो आहे, त्यांच्या हिताची काळजी घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली.

काँग्रेस अध्यक्षांच्या समोर महाराष्ट्राची भूमिका मांडताना, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले की, महाराष्ट्र विकास आघाडी सरकार कोरोना विरोधातील लढाई पूर्ण ताकदीने लढत आहे. देशात सर्वांत  जास्त कोरोना चाचण्या महाराष्ट्रात केल्या जात आहेत. लसीकरणाच्या बाबतीतही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पण केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला हव्या तेवढ्या प्रमाणात लसींचा  पुरवठा केला जात नाही. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. केंद्र सरकारने मागणीप्रमाणे महाराष्ट्राला पुरेसा लसींचा पुरवठा केला पाहिजे. राज्यात रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठ्या अडचणी येत आहेत. केंद्र सरकारने न्याय भावनेने रेमडिसीवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा तातडीने राज्याला केला पाहिजे या मागण्या महाराष्ट्राच्यावतीने  सोनिया  गांधी यांच्यासमोर मांडल्या.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा झालेल्या या बैठकीस राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महाराष्ट्र विधिमडंळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, झारखंडचे अर्थमंत्री व झारखंड प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामेश्वर सोरेन यांच्यासह काँग्रेस अध्यक्षांच्या सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button