राज्यातील काँग्रेस उमेदवारांची नावे जवळपास निश्चित?

Congress

मुंबई :- काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी देण्याबाबत काही निर्णय घेण्यात आले . यात सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, मुकुल वासनिक, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांची पत्नी अमिता, राजीव सातव यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने निश्चित केली आहे.

मागील निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेल्या वेळी २६ जागा आल्या होत्या. या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. यंदा पक्षाच्या वाट्याला २५ जागा येतील, अशी शक्यता पक्षाकडून वर्तविण्यात येत आहे . त्या पार्श्वभूमीवर कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार उभा करावा याबाबत पक्षांतर्गत चर्चा करण्यात आली . सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माणिकराव ठाकरे (यवतमाळ-वाशिम), मुकुल वासनिक (रामटेक), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई), राजीव सातव (हिंगोली), अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता (नांदेड), चारुलता टोकस (वर्धा) यांच्या नावांची अ. भा. काँग्रेस समितीला शिफारस करण्यात आली. तसेच पुणे, नागपूरसह एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या मतदारसंघांतील उमेदवारांचा निर्णय दिल्लीत घेतला जाईल.

नागपूर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी आहे. नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवार कोण असावा याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेस नेते दिल्लीत गडकरी यांना बळ देतात. या पार्श्वभूमीवर नागपूरचा उमेदवार वरिष्ठ पातळीवर ठरविण्यात येणार असल्याची माहितीही या बैठकीतून समोर आली आहे .