निष्ठावान कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेस पक्ष सांभाळणार-ऍड. विजय भोसले

Vijay Bhosale

रत्नागिरी(प्रतिनिधी) : अत्यंत बिकट परिस्थितीत जरी माझ्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आली असली तरी माझा काँग्रेसच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे.

आहजी जिल्ह्यात हजारो काँग्रेस कार्यकर्ते निष्ठावान आहेत, पक्षावर प्रेम करणारे आहेत. अशांना घेऊन पक्ष सांभाळायचा आहे व नव्याने निर्माण करायचा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय भोसले यांनी काँग्रेसभवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी आमदार हुस्नबानू खलिपे, ज्येष्ठ नेते अशोक जाधव, प्रदेश सचिव रूपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अश्विनी आगाशे, विधानसभा क्षेत्र समन्वयक कपिल नागवेकर, दिपक राऊत यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग-धंदे, शिक्षण आदी समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हा काँग्रेसने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन दिले.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भोसले म्हणाले की, माझ्यावर कठीण काळात जबाबदारी आली असली तरी या परिस्थितीत संधीही मिळू शकते. या संधीचा फायदा घेत मी सर्वांना एकत्र घेऊन पक्ष वाढविण्याठी प्रयत्न करणार आहे. विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, राजापूर मतदारसंघ काँग्रेसचाच आहे. आघाडी झाली तर चिपळूण मिळावा, यासाठीही आम्ही प्रयत्न करु. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आम्हाला किती सहकार्य मिळाले, याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे. त्याची पक्ष दखल घेईल.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी आमदार हुस्नबानू खलिफे, हुसेन दलवाई पक्षात काम करू देत नाहीत, असा आरोप केला आहे. या आरोपाचे खंडन करताना आमदार हुस्नबानू खलिफे म्हणाल्या की, नियमाप्रमाणे पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची निवड केली होती. त्याला कुणाचाच विरोध नव्हता. जिल्हाध्यक्षांना पक्षवाढीसाठी मदत करण्यासाठी सहयोगी म्हणून कार्याध्यक्ष अनेक ठिकाणी नेमले गेले. माझीही कार्याध्यक्ष म्हणुन नियुक्ती केली. मात्र, रमेश कदमांना ही अडचण वाटली. कार्याध्यक्ष हा जिल्हाध्यक्षांपेक्षा मोठा नाही, मग कदमांना हे का खटकावे, असा प्रश्न खलिफे यांनी उपस्थित केला.