नोटबंदी विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी करणार आंदोलन

मुंबई: नोटबंदीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झालेत. काँग्रेस जानेवारीमध्ये देशव्यापी आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही 9 जानेवारीला राज्यव्यापी आंदोलन करण्याची घोषणा केलीय.

नोटबंदीची मुदत 30 डिसेंबरला संपतेय. जानेवारीत काँग्रेस नोटबंदीविरोधात आंदोलन उभारणार आहे. देशव्यापी आंदोलनात वेगवेगळ्या पातळ्यांवर काँग्रेस विरोध करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आंदोलनाची घोषणा करणार असल्याचं चव्हाण यांनी सांगितलंय.

नोटबंदीविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झालीय. येत्या 9 जानेवारीला राष्ट्रवादी जिल्ह्यां-जिल्ह्यांत रस्त्यावर उतरून नोटाबंदीचा विरोध करणार आहे. याबद्दलची घोषणा राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या बैठकीत करण्यात आली . या बैठकीला शरद पवार, अजित पवार, सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मोठे नेते हजर होते.