राज्यात आघाडीचे केवळ २४ आमदारच निवडून येतील – मुख्यमंत्री

CM Fadnavis

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे राज्यात केवळ २४ आमदारच निवडून येतील, असा दावा करत येत्या २४ तारखेला राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा येथे रविवारी झालेल्या सभेत व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा:- शरद पवारांची मानसिकता ढासळली म्हणून ते  हातवारे करताहेत : मुख्यमंत्री

यावेळी ते म्हणाले की, आमची महायुती ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारी आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या गद्दारला येथील जनता धडा शिकवेल. जनताच येथील बंडखोर उमेदवाराला त्याची जागा दाखवून देईल.

बंडखोराचे डिपॉझिट जप्त होऊन पुन्हा भारती लव्हेकरच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या सभेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्या समोर निस्तेज विरोधी पक्षाचे आव्हानच नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने राज्यात नेत्रदीपक अशी कामगिरी केली. आघाडीच्या सरकारच्या काळापेक्षा आमची कामे दुप्पट आहेत. मुंबईतील मेट्रोचे जाळे, ट्रान्स हार्बर, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, कोस्टल रोड या प्रकल्पांमुळे मुंबई अधिक गतिमान होणार असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या वेळी मंचावर मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे, भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, भाजप प्रदेश सचिव संजय पांडे, आदी उपस्थित होते.