आज सोनिया-पवार आणि नेत्यांमध्ये बैठक,’शिवमहाआघाडी’च्या फार्म्युल्यावर अंतिम निर्णय होणार?

Sharad Pawar-Sonia Gandhi

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सोमवारी दिल्लीत जवळपास ५० मिनिटे बैठक झाली. या बैठकीदरम्यान महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत चर्चा झाल्याची बातमी इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेचा फॉर्म्युला देखील ठरल्याचं वृत्तपत्राने म्हटलं आहे.

पवार-सोनिया भेटीत फार्मुला ठरला, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद देण्यावर एकमत?

इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला असून,पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, तर काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाला पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद, तर मंत्रीमंडळात शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १४ आणि काँग्रेसला १३ मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेचा मुख्यंमत्री हे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बनवण्यात यावे असे पवार आणि सोनियांमध्ये एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तेचा फॉर्म्युला ठरल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होणार आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे तर काँग्रेसकडून अहमद पटेल, के सी वेणुगोपाल आणि मल्लिकार्जुन खरगे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत दोन्ही पक्षातील नेते चर्चा करून ठरलेल्या फार्म्युल्यावर शिक्कामोर्तब करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.