अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड व्हावी, अधिवेशन एक दिवस वाढवा; काँग्रेसची मागणी

Nana Patole

मुंबई :- “आमचा विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला आहे. त्यामुळे या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक झाली पाहिजे. त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी एका दिवसाने वाढवावा, अशी मागणी काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काँग्रेसची बैठक पार पडली. बैठकीनंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष निवडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय होईल. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी, हा आमचा प्रयत्न आहे. यासाठी एक दिवसाने अधिवेशन वाढवावे, अशी काँग्रेसची मागणी आहे. अध्यक्षपदाचा उमेदवार ठरलेला आहे, असे पटोले म्हणाले. दरम्यान, नाना पटोले यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर भाष्य केले. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बजेटमध्ये तरतूद करायला हवी होती, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

बिनविरोध निवड व्हावी
“विधानसभा अध्यक्षाची निवड याच विधिमंडळ कामकाजात व्हावी आणि तो बिनविरोध व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांशी आणि विरोधी पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हायकमांडचा आहे.” असे पटोले म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) नवे अध्यक्ष?
विधानसभा अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. तसेच संसदीय कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. शिवाय ते राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून चव्हाण यांना हे पद देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चव्हाण यांच्या नावाचा उल्लेख केल्यास राष्ट्रवादीकडून आक्षेप घेण्याची शक्यता आहे. चव्हाण आणि राष्ट्रवादीचे फारसे पटले नाही. चव्हाण विधानसभेचे अध्यक्ष झाल्यास ते भविष्यात डोईजड होऊ शकतात, त्यामुळे चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, बऱ्याच आमदारांनी कोविड चाचणी केली नाही. या आमदारांना काल अधिवेशनात बसता आले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ही बातमी पण वाचा : ‘अमित शहा खुनी है’ या घोषणांनी सभागृहात राडा; सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER