शिवसेनेच्या फोडाफाडीवरून काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आक्रमक, केली ही मागणी

Vikas Thackeray

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चर्तुर्वेदी यांनी काल नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे यांच्यासह पूर्व नागपुरातील ५० ते ६० कार्यकर्त्यांना पक्षात घेतले. यावरून आता काँग्रेसचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांचा फोडाफाडीबाबत महाविकास आघाडीच्या समन्वय समितीने निर्णय घ्यावा, असे कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे आज आक्रामक होत म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या समन्वय समितने कार्यकर्ते फोडाफोडीबाबत निर्णय घ्यावा. काँग्रेसमध्ये पण इतर पक्षातून लोकं यायला तयार आहेत’, असं म्हणत काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी फोडाफोडीवर नाराजी व्यक्त केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

नागपुरात कालचा प्रकार घडल्यानंतर समन्वय समितीने याबाबत निर्णय घ्यायला हवा. मग तिन्ही पक्षांना एकमेकांचे कार्यकर्ते पळविण्याची सूट राहील. वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या पातळीवर निर्णय घेतल्यावर स्थानिक स्तरावर आम्हीही तसा निर्णय घेऊ शकू. नागपुर शहरात दोनच पक्ष आहेत ते म्हणजे कॉंग्रेस आणि भाजप. या दोनच विचारधारेचे लोक शहरात बहूसंख्येने आहेत. आमचा कॉंग्रेस पक्ष मोठा आहे आणि आमच्याकडेही इतर पक्षांतील कार्यकर्ते येण्यास इच्छूक आहेत. पण आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळत आहोत, असे ठाकरे म्हणाले.

या संदर्भात महाविकास आघाडीच्या समन्वय समितीकडून जोपर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत शहर कॉंग्रेस कमिटी याबाबत निर्णय घेणार नाही. पण आता आम्ही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना विनंती करणार आहो की, महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांतील नगरसेवक, कार्यकर्यांना आपल्या पक्षात घेण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असेही ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER