‘तुला चपलेनं मारेन !’ काँग्रेस आमदार रणजित कांबळेंची आरोग्य अधिकाऱ्याला धमकी

Ranjit Kamble

वर्धा : देवळी-पुलगाव विधानसभा क्षेत्रात आमदाराला कुठलीही विचारणा न करता थेट कोविड (Covid-19) चाचणी शिबीर घेतल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे (Congress) आमदार रणजित कांबळे (Ranjit Kamble) यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना अश्लील शिवीगाळ करून थेट पोलिसांसमोरच जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांची ही संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.

त्यानंतर प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. डवले यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी निवेदनवजा तक्रार दिली आहे. प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्यसेवा देण्यासह कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. नवीन कोविड बाधित वेळीच ट्रेस करून त्यांना चांगली आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने देवळी तालुक्यातील एका गावात कोविड चाचणी शिबीर लावण्यात आले होते. आमदाराला विचारणा न करता थेट कोविड चाचणी शिबीर लावल्याचे कारण पुढे करत जीवे मारण्याची धमकी दिली. “तुला चपलेनं मारणार, तू मला भेट आता… तुला चपलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटतं की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार. ” अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. डवले यांनी केली आहे. ही बाब पुढे आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेनं संताप व्यक्त केला आहे.

संघटनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. कोरोनाकाळात आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. अशात आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली आहे. हे वर्तन चुकीचं असून, संघटना याचा निषेध करते. त्याचबरोबर संबंधित आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा व नियमानुसार कारवाई करावी, अन्यथा राज्यातील आरोग्यसेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा विनंतिवजा इशारा संघटनेनं दिला आहे.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button