पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; पवारांना लवकरच भेटण्याची शक्यता

Sharad Pawar

मुंबई : काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा अध्यक्षपदावर अप्रत्यक्षपणे दावा ठोकला आहे.यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून लवकरच काँग्रेसचे नेते पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

यासोबतच महाविकासआघाडीत काही खात्यांची अदलाबदल होणार असल्याच्या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. यामध्ये आणखी एका उपमुख्यमंत्रिपदाची निर्मिती करून ते काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. या सगळ्याविषयी काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र, केवळ चांगली खाती पदरात पडणार असतील तरच काँग्रेसचे नेते या चर्चेला तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या काही क्षणांनंतर लगेचच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा तिन्ही पक्षात चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER