
नवी दिल्ली :राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांतील अनेक नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. अनेकांची नावे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात येत आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेस विनाकारण बदनाम होत आहे. याकडे मुंबई काँग्रेस (Congress) सरचिटणीस विश्वबंधू राय यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचे लक्ष वेधले असून, या परिस्थितीत सत्तेतून बाहेर पडलेलेच चांगले, असे स्पष्ट मत राय यांनी पाठवलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. राय यांनी गांधी यांच्याबरोबरच राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल आदी वरिष्ठ नेत्यांनाही हे पत्र दिले आहे.
पीएमसी बँक, सिंचन, टॉप्स ग्रुप आणि बीएमसी टेंडर अशा घोटाळ्यांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे नावे आहेत. या प्रकरणांशी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांचा संबंध नाही. मात्र सत्तेत सहभागी असल्यामुळे काँग्रेस बदनाम होत आहे. असे सांगत त्यामुळे पक्षाने सत्तेतून बाहेर पडलेलेच चांगले, असे मत राय यांनी व्यक्त केले आहे. राय हे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्याजवळचे मानले जातात. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांत राय यांनी सोनिया गांधी यांना दुसऱ्यांदा पत्र पाठवून विद्यमान सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला