सेलिब्रिटींसाठी वेळ, पण संभाजीराजेंसाठी नाही; काँग्रेस नेत्यांची पंतप्रधानांवर टीका

Sachin Sawant and pm modi

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द केले आहे. यावरून राज्यात निराशा पसरली आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Modi) सेलिब्रिटींबरोबरचे फोटो पोस्ट करत टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणासंदर्भात चार पत्रे पाठवली आहेत. मात्र, तरीही पंतप्रधानांनी भेटीची वेळ दिली नाही, असे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. या मुद्द्यावरून आता पंतप्रधानांवर टीका होत आहे. कंगना रानौत आणि प्रियंका चोप्रा यांच्याबरोबरच्या पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो सचिन सावंत यांनी ट्विट केला आहे. “प्रियंका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहात होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे.” असे सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, संभाजीराजे यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले होते. ‘मराठा आरक्षणाविषयी केंद्राचा काहीही संबंध नाही. त्यामुळे भेटून उपयोग नसल्याने भेट दिली नसेल.’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले. “महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही, हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे आहे. मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे.” असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button