कॉंग्रेसमधील घोटाळेबाज नेत्यांनी धरली भाजपची वाट; शिवसेनेचा हल्लाबोल

BJP-Shivsena

मुंबई : देशातील कॉंग्रेसचे नेते सत्तेपासून दूर राहण्यास अजिबात तयार नाहीत. लोकसभेतला कॉंग्रेसचा पराभव पाहता नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. कर्नाटकी नाट्य रंगीत तालमीत असतानाच आता गोवा कॉंग्रेसमध्येही मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते चंद्रकांत(बाबू) कवळेकर यांच्यासह काँग्रेसचे १० आमदार पक्षत्याग करून भाजपमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेसच्या १० आमदारांमध्ये फ्रान्सिस सिल्व्हेरिया, फिलिप नेरी रॉड्रिग्ज, क्लिओफेसिओ डायस, विल्फ्रेड डीसा, नीलकंठ हरळणकर आदींचा समावेश आहे. भाजपप्रवेशाचे नेमके कारण देण्यास कवळेकर यांनी नकार दिला. भाजपची ताकद काँग्रेस आमदारांमुळे आणखी वाढली आहे. काँग्रेसजवळ आता केवळ पाच आमदार उरले आहेत.

याबाबत गोवा शिवसेनेने भाष्य केले आहे. गोव्यातील राजकारण म्हणजे बाजार झाला आहे. काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये जाणे म्हणजे व्यवसाय झाला असल्याची टीका शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

या प्रसिद्धिपत्रात कामत म्हणतात, कोणत्याही पक्षाची लोकप्रियता हे त्या पक्षाच्या नेत्यांच्या चारित्र्यावर अवलंबून असते. ज्या घोटाळेबाज आणि भ्रष्ट नेत्यांनी काँग्रेस पक्षाची लोकप्रियता घटवली तेच नेते आज भाजपमध्ये जात आहेत. त्‍यामुळे यापुढे गोव्यातील जनतेने काँग्रेस, भाजप आणि प्रस्थापित राजकारण्यांना गोव्याच्या राजकारणातून हद्दपार करून दमदार तरुण नेत्यांना निवडून आणण्याची गरज आहे.

तसेच, नवीन राजकीय घडामोडी म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांची आणि मतदारांची नेत्यांकडून होत असलेली चेष्टा  आहे. जे कार्यकर्ते दिवसरात्र स्वतःच्या नेत्यांसाठी राबून प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कार्य करतात त्यांच्या भावनांची पायमल्ली करणारी ही घटना आहे, असेही कामत यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेसमधील ज्या नेत्यांनी घोटाळा केला तेच नेते भाजपत येत आहेत, असेही त्यांनी म्हटले.