पुणे आयुक्तांची बदली हे गलिच्छ राजकारण, काँग्रेस नेत्याकडून अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा

Sanjay-Balgude-Ajit-Pawar

पुणे :- कोरोनाच्या संकट काळातही पुण्याचे माजी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची करण्यात आलेली आणि राज्यात लावण्यात आलेल्या नव्या लॉकडाऊनवरुन आता महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. पुणेआयुक्तांची बदली राजकीय दबावातून केल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केला आहे. बालगुडेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

शेखर गायकवाड यांची बदली केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. शेखर गायकवाडांच्या बदलीमागे मुळात मराठी अधिकारी विरुद्ध हिंदी अधिकारी असा वाद आहे. शेखर गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. वास्तविक बघता त्यांची नेमणूक होऊन जेमतेम सात आठ महिने झाले होते. त्यातही मार्चमध्ये कोरोना महामारी सुरु झाल्यापासून चार महिन्यात त्यांनी जेवढे शक्य आहे तेवढे प्रशासक म्हणून अतिशय चांगले काम केले आहे. पुण्यात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याचे श्रेय शेखर गायकवाड यांना जाते. पालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकारणे त्यांनी बाहेर काढली. एका कर्तबगार अधिकाऱ्याची बदली करणे हे गलिच्छ राजकारणाचे प्रतिक आहे. काही सत्ताधाऱ्यांना आयुक्त हे आपल्या ताटाखालचे मांजर असते, असे वाटणे योग्य नाही. असेही बालगुडे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मोदी सरकारला पर्याय देणं राष्ट्रीय गरज; मी पुढाकार घ्यायला तयार – शरद पवार

शेखर गायकवाड यांची बदली कोणाच्या दबावाखातर झाली आहे. त्यांच्या बदलीने राज्य सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. त्यांची बदली रद्द करुन पुन्हा पुणे पालिका आयुक्तपदी नेमणूक करावी, अशी मागणी संजय बालगुडे यांनी केली आहे.

दरम्यान, नवा लॉकडाऊन कोरोनासाठी नव्हे तर विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यासाठी केल्याचा गंभीर आरोपही बालगुडे यांनी पत्रात केला आहे. या संदर्भात संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER