आदित्यजी चिंता नको…. : काँग्रेस नेत्याचे वक्तव्य

Satyajit Tambe-Aditya Thackeray

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर (Sushant Singh Rajput Sucide Case) राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर होणाऱ्या आरोपावर महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी उत्तर दिले आहे.

आदित्यजी, चिंता करू नका. सुशांतप्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस हे शेंबडं पोरगंही सांगेल, असा टोला ट्विटरच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी लगावला आहे. तसेच आपण करत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे, अशी टीका तांबे यांनी केली आहे.

सुशांतसिंह प्रकरणात विरोधकांकडून आरोप होत होते. त्याकडे आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केल्याने आदित्य यांनी तात्काळ एक पत्रक काढून विरोधकांच्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे .

मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे’, असे खडेबोलही आदित्य यांनी सुनावले. सुशांत प्रकरणी कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, असे आवाहनही आदित्य यांनी केले. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल, या भ्रमात कुणी राहू नये, असा सूचक इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER