आरएसएस सोडून या देशात सर्व जण दहशतवादी आहेत का ?- राहुल गांधी

Rahul Gandhi

नवी दिल्ली :- आरएसएसला (RSS) सोडून या देशात सर्व जण दहशतवादी आहेत का? तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दुरवस्था करत आहात, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारचा (Modi Govt) समाचार घेतला. सोबतच यंदाच्या अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, सरकार किल्लाबंदी का करत आहे? ते शेतकऱ्यांना घाबरत आहेत का? शेतकरी शत्रू आहेत का? शेतकरी देशाची शक्ती आहे. त्यांना दाबायचं, मारायचं आणि धमकी द्यायचं हे सरकारचं काम नाही. सरकारचं काम शेतकऱ्यांशी बातचित करणं आणि समस्या सोडवण्याचं आहे. हे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि देशाच्या हिताचं नाही, असं राहुल गांधी म्हणाले. जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. त्यांच्या हिताचा विचार करणं हे तुमचं कर्तव्य आहे. एक टक्का  लोकांसाठी तुम्ही देशाला विकू शकणार नाही. शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवर टाळाटाळ करण्याची गरज नसून पारदर्शी आणि स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे. मी शेतकऱ्यांना चांगल्याने ओळखतो. ते कुठंही जाणार नाहीत. अखेर एक दिवस सरकारलाच मागं  हटावं लागेल. त्यापेक्षा आताच माघार घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत त्यांनी नाराजीचा सूर आळवला. देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ९९ टक्के जनतेला आधार दिला जाणं अपेक्षित होतं. पण, इथं मात्र एक टक्का जनतेलाच आधार मिळत आहे. मध्यमवर्गीय जनता, कामगार, शेतकरी यांच्या वाट्याचा पैसा ठरावीक अशा १०-१५ लोकांच्याच वाट्याला गेला. इथं  सरकारकडून जनतेच्या हातात पैसा दिला जाण्याची गरज होती. लघु उद्योजकांना आर्थिक पाठबळ देत अर्थव्यवस्थेला गती देणं  अपेक्षित होतं. पण, इथं मात्र उलट चित्र पाहायला मिळालं, असं म्हणत त्यांनी रुतलेल्या अर्थचक्राकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं.

चीनकडून देशाच्या भूभागात वारंवार घुसखोरी केली जात असताना त्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे चीन भारतात शिरकाव  करतो. भारताच्या हजारो किमीच्या जमिनीवर ताबा मिळवतो. पण तुम्ही चीनला बजेटमधून संदेश देता की, संरक्षणासाठी जास्त पैशांची तरतूद करणार नाही. तीन-चार हजार कोटी रुपये तुम्ही वाढवले. तुम्ही चीनला नेमका संदेश काय दिला? तुम्ही आतमध्ये येऊ शकता. तुम्हाला जे करायचंय ते करा. आम्ही आमच्या सेनेला पाठिंबा देणार नाहीत. आमचे जे जवान लडाखमध्ये आहेत, आमच्या वायुदलाचे पायलट जिथे आहेत, त्यांना आज काय वाटत असेल? आमच्यासमोर एवढे मोठे आव्हान आहे. पण आमचे सरकार सैन्यदलाला पैसे देत नाही. याशिवाय जे आमच्या दलाचे हक्काचे पैसे आहेत ते पैसे फक्त मोजक्या एक टक्का उद्योगपती लोकांना दिले जात आहेत. यातून देशाला काही फायदा होणार नाही. जे आमच्या सैन्याला पाहिजे ते सरकारने दिले  पाहिजे, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER