आमचं वय झालं, आधी तरुणांना लस द्या; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याच आवाहन

नवी दिल्ली : आजपासून देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाच्या अभियानाला (Corona vaccination) सुरूवात झाली आहे. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिल्लीतील एम्समध्ये जाऊन भारत बायोटेकच्या को-व्हॅक्सिनचा पहिला डोज घेतला. मात्र जेष्ठ नागरिकांऐवजी तरुणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्राधान्य दिले पाहिजे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनी व्यक्त केले. माझे वय आता 70 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तरुणांना कोरोनाची लस आधी दिली पाहिजे. माझ्या तुलनेत त्यांना आणखी बरीच वर्षे जगायचे आहेत. मी फारतर आणखी 10-15 वर्षे जगेन, असे मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले.

भारतात आजपासून कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जून खरगे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना तुम्ही कोरोनाची लस घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मल्लिकार्जून खरगे यांनी माझ्यापेक्षा देशातील तरुणांना कोरोनाची लसीची अधिक गरज असल्याचे सांगितले.

दरम्यान, कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस देण्यात येणार आहे. सरकारकडून या टप्प्यासाठी तयारी पूर्ण करण्यात आली असून, या टप्प्यात सरकारी रुग्णालयासोबत खासगी रुग्णालयातही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. खासगी रुग्णालयात करोना लसीच्या एका डोससाठी केंद्रानं 250 रुपयांची किंमत निश्चित केली आहे. सरकारी रुग्णालयांत मात्र करोना लस अगोदरप्रमाणेच मोफत मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER