मोदी लाटेत निवडून आलेला काँग्रेसचा नेता

Maharashtra Today

मुंबई :- राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांचे कोरोनाने निधन झाले. २०१४ च्या मोदी लाटेत ते काँग्रेसच्या तिकीटावर जिंकले होते. उल्लेखनीय म्हणजे त्यावेळी राजीव सातव आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे काँग्रेसचे दोनच खासदार निवडून आले होते.

माणिकराव ठाकरेंची फील्डिंग

२०१४ ला राजीव सातव यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी हिंगोली मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. मात्र, राजीव सातव यांच्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीशी वाटाघाटी केल्या होत्या.

राष्ट्रवादीसाठी दुसरा मतदारसंघ सोडून राजीव सातव यांच्यासाठी हिंगोली मतदरासंघ मागून घेण्यात आला. यावरुन तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राजीव सातव यांच्या समर्थकांना पक्षांतर्गत टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव करत विजय मिळवला.

२०१९ मध्ये उमेदवारी नाकारली

राजीव सातव यांनी २०१९ मध्ये लोकसभेची उमेदवारी नाकारली. तोपर्यंत राजीव सातव यांनी काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर चांगल्या प्रकारे बस्तान बसवले होते. ते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले होते. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात ते भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार

सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला. संसदेत १०७५ प्रश्न विचारत २०५ चर्चांमध्ये भाग घेतला. राजीव सातव यांची सभागृहात उपस्थिती ८१ टक्के होती. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button