मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आम्ही तगडा उमेदवार देऊ – कॉंग्रेस

CM Fadnavis-balasaheb-thorat

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात कॉंग्रेसची चांगलीच पडझड झाली आहे. राज्यात तर त्यापेक्षाही बिकट स्थिती कॉंग्रेसची झालेली आहे. परंतू असे असले तरी कॉंग्रेसचे निष्ठावंत भाजपला आव्हान देण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. अधिक चर्चेत न येता कॉंग्रसच्या विधानसभेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या हालचालींना दिल्लीत वेग आला आहे.

विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील निकालाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्यासाठी काँग्रेसच्या छाननी समितीच्या गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत अनेक बैठका झाल्या. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसची पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसही भाजपच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचेच डाव त्यांच्यावर उलटण्याच्या तयारीत आहेत.

लोकसभा निवडणुकीपासून भाजपने थेट काँग्रेसच्या नेतृत्वाचीच कोंडी करण्याची रणनीती आखली होती. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची त्यांच्या नांदेड मतदारसंघात कोंडी केली. परिणामी चव्हाण यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही भाजपचे यादृष्टीनेच प्रयत्न सुरू आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या संगमनेर मतदारसंघात अडकवून ठेवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. भाजपच्या याच खेळीला काँग्रेसकडून आता जोरदार प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आम्ही तगडा उमेदवार देऊ, असं बाळसाहेब थोरात यांनी सांगीतलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तगडा ऊमेदवार देण्याची घोषणा करून थोरातांनी भाजपला आव्हान दिलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक चांगलीच रंजक होण्याची शक्यता आहे.