काँग्रेसचे अब्दुल सत्तार भाजपच्या गळाला?, मुख्यमंत्र्यांची घेतली भेट!

Sattar-Fanavis

मुंबई :- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. ते आता भाजपच्या गळाला लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसनं औरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं सत्तार चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी झांबड यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात औरंगाबादसह पाच मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. औरंगाबादमधीन सुभाष झांबड यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सत्तार यांनी पक्षाविरोधात दंड थोपटले आहे. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र पक्षानं उमेदवारी न दिल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे.

ही बातमी पण वाचा : अंबाबाईला साकडे घालून महायुतीची आज कोल्हापुरात महासभा!

लोकसभा निवडणुसाठी मागील अनेक महिन्यांपासून कामाला लागलेले होतो. काँग्रेस पक्ष विस्तारण्यासाठी गावोगावी फिरलो. एल्गार यात्रा काढली. कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. मात्र इतकं करूनही पक्षानं मला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी कालच स्पष्ट केलं. शिवसेनेनं औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली आहे. खैरे यांच्याविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसमध्ये आणून तिकीट द्यावं, यासाठी सत्तार यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे आग्रह धरला होता. मात्र अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. यानंतर सत्तार यांनी स्वत: बंड करत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.