शिवसेनेला अडचणीत टाकण्यासाठी काँग्रेस सज्ज; नालेसफाई आकड्यावरून घेरणार

मुंबई : महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मोट बांधून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेत एकत्र असले तरी शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा वाद नेहमीच बघायला मिळतो. मुंबई महापालिकेतही या दोन्ही पक्षांत धुसफूस सुरूच आहे. एखादी संधी मिळताच महापालिकेत शिवसेनेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सतत केले जातात. आता नालेसफाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी डाव आखला आहे. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिकेची नालेसफाईची आकडेवारी खोटी असल्याचा दावा केला आहे.

नालेसफाईच्या खोट्या आकडेवारीचा आपण पर्दाफाश करणार असल्याचे रवी राजा यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेने मुंबई शहरात १०२ टक्के, पूर्व उपनगरात ९३ टक्के तर पश्चिम उपनगर ९६ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. त्यावर रवी राजा यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. महापालिकेचा हा दावा खोटा असून ठेकेदारांना मदत करण्यासाठी नालेसफाईचे आकडे फुगवले जात असल्याचा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला.

मुंबईतील खरी परिस्थिती अशी आहे की, पालिका जी आकडेवारी सांगत आहे तेवढी नालेसफाई झालेली नाही. केवळ पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई करणं योग्य नाही. वर्षभर नालेसफाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. महापालिका नालेसफाईची देत असलेली आकडेवारी खोटी आहे. पालिकेने एवढी नालेसफाई केली तर नाल्यातील गाळ गेला कुठे? हा गाळ कुठे टाकला याची माहिती महापालिका देत नाही. मग नालेसफाईची आकडेवारी आलीच कुठून? असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नालेसफाईच्या मुद्यावरून आता काँग्रेस आणि शिवसेना समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button