
- पद्म पुरस्कारांची राज्याची शिफारस केंद्राने फेटाळली
मुंबई : विविध पद्म पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) तब्बल ९८ नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती आणि त्यात प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पद्मविभूषण देण्याचा आग्रह धरला होता ही बाब आता समोर आली आहे. आघाडी सरकारने पाठविलेल्या ९८ नावांपैकी केवळ एकच नाव केंद्राने स्वीकारल्याने काँग्रेसने आगपाखड केली आहे.
आघाडी सरकारने ९८ नावे सुचविली आणि त्यातील एकच केंद्राने सुचविले यावरून केंद्रात राज्य सरकारची पत काय ते लक्षात येते अशी टीका आता सुरू झाली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कार मिळण्यासाठीचा निकष आहे का असा सवाल प्रदेश काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
नेमके काय झाले? दरवर्षी प्रत्येक राज्य सरकारकडून पद्म पुरस्कारांसाठी केंद्रीय गृह खात्याकडे शिफारशी केल्या जातात. यावेळी गेल्या सप्टेंबरमध्येच महाविकास आघाडी सरकारने ९८ नावे गृह विभागाकडे पाठविली. काल पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केली. त्यात राज्याने सुचविलेल्यांपैकी केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. यादीतील अन्य कोणालाही पुरस्कार मिळाला नाही. सिंधुतार्इंना पद्मभूषण द्यावे अशी शिफारस महाविकास आघाडी सरकारने केलेली होती पण त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
कृषी कायदे, कामगार कायदे, रेल्वेसह विविध क्षेत्रांचे खासगीकरण यावरून देशातील विरोधी पक्षांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. केंद्र सरकारविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे सरकार अदानी-अंबानींना देश विकायला निघाले असल्याची टीका काँग्रेस करीत आहेत. त्याच काँग्रेसचा सहभाग असलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने पद्मविभूषण पुरस्कारासाठी मुकेश अंबानी यांच्या नावाची शिफारस केली ही बाब स्पष्ट झाली आहे. एकीकडे अंबानींचा तिरस्कार करायचा आणि दुसरीकडे त्यांना पुरस्कार देण्याचा आग्रह धरायचा ही काँग्रेसच्या भूमिकेतील विसंगती असल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत आहे.
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांचे नाव पद्मविभूषणसाठी पाठविले होते. मात्र, महाराष्ट्रातून कुणालाही हा पुरस्कार मिळालेला नाही. तर सिंधुताई सपकाळ, अदर पूनावाला, शीतल महाजन, माधुरी दीक्षित मोहन आगाशे, राजारामबापू पाटील (मरणोत्तर), डॉ.मिलिंद किर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या सप्टेंबरमध्येच केंद्राकडे पाठविण्यात आली होती. पद्मश्रीसाठी यशवंतराव गडाख,राणी मुखर्जी, डॉ.जगन्नाथ दीक्षित, मधुकर भावे, खा.डॉ.अमोल कोल्हे, यांच्यासह ८८ नावांची शिफारस राज्याकडून केली गेली होती. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना पद्मश्री द्यावी असा आग्रही आघाडी सरकारने धरला होता पण त्यांना पुरस्कार मिळाला नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला