
मुंबई : उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन उपमुख्यमंत्रिपद असावेत, राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे काँग्रेसला (Congress) हे पद देण्यात यावे, असा प्रस्ताव काँग्रेसने महाविकास आघाडी (MVA) सरकारमधील आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर (NCP) मांडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
विशेष म्हणजे हे पद ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना देण्यात यावे, अशी सूचना काँग्रेस पक्षश्रेष्ठींने केल्याची माहिती आहे .
राऊत यांना राज्याचे दुसर्या क्रमांकाचे पद दिल्यास काँग्रेसचा पारंपरिक दलित मतदार पुन्हा एकदा मोठ्या ताकदीने पक्षाच्या मागे उभा राहील. मागच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीबरोबर दलित समाज मोठ्या संख्येने गेल्याने काँग्रेसला फटका बसला होता. सत्तेत आल्याने हे नुकसान भरून काढण्यासाठी काँग्रेस आता उपमुख्यमंत्रिपदासाठी राऊत यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करत आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडून काढून घेऊन नाना पटोले यांना देण्याचा निर्णय झाला. यानंतर पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच दरम्यान काँग्रेसने उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली असून आता चेंडू शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर्टात गेला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे काँग्रेसचे लक्ष लागले आहे.
ही बातमी पण वाचा : राज्यपालांना राज्य सरकारकडून विमानाचं उपलब्ध झाले नाही; नवा वाद पेटण्याची शक्यता
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला