काँग्रेस सरकार इंधन-गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरणार : नाना पटोले

Congress - Nana Patole

दिल्ली : केंद्रात मोदी सरकार (Modi Goverment) आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल-डिझेल, गॅसच्या दरात वाढ होत चालली आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर ९६ रुपये तर डिझेल ८६ रुपये लिटर झाले आहे. यातच गॅस सिलेंडर ८०० रुपये झाला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यात दरवाढ करून सरकारने लूट चालवली आहे. मोदी सरकारने इंधन दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, नाही तर काँग्रेस (Congress) रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, “मोदी सरकार देशातील सर्वसामान्य लोकांचे सरकार नाहीत, ते मुठभर लोकांच्या हितासाठी काम करणारे सरकार आहे. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर कमी आहेत. या तेलाच्या आजच्या किंमती पाहता पेट्रोल ३५ रुपये तर डिझेल २५ रुपये लिटर असायला पाहिजे होते. पण पेट्रोलने अनेक ठिकाणी शंभरी गाठली आहे. यामुळे महागाई वाढली. या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हात वर केले. पेट्रोल डिझेलच्या किंमती आपल्या हातात नसल्याचे राज्यसभेत स्पष्ट केले आहे. भाजप सरकारने सत्तेवर येताना पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनालाही त्यांनी हरताळ फासला आहे. लोकांचे खिसे कापण्यासाठी जनतेने भाजपाला सत्ता दिली का? याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे.”

“यूपीचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते. म्हणूनच ७० रुपये लिटर पेट्रोल झाले, त्यावेळी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यासह एकाही सेलिब्रिटीने ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही का?” असा प्रश्न नाना पटोले यांनी केला आहे. सरकारने इंधन व गॅस दरवाढ तत्काळ कमी करावे आणि सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER