काँग्रेस आर्थिक चणचणीत; निधी उभारण्यासाठी बैठकीत निर्णय

sonia Gandhi

नवी दिल्ली :- देशात सर्वांत जास्त सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस (Congress) पक्षाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. पक्षाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाल्याने काँग्रेसची एक बैठकही पार पडली. त्यात निधी उभारण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच फंड उभारण्याासाठी नेत्यांनी जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहनही करण्यात आलं.

२०१४ मध्ये देशात सत्ताबदल झाल्यापासून काँग्रेसला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसने निधी उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठीच काँग्रेसची एक बैठक पार पडली. त्यात काँग्रेसच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली असून निधी संकलन करण्यावरही भर देण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि पंजाबमधील काही नेत्यांशी चर्चा केली होती. या बैठकीत राज्य सरकारातील मंत्री आणि संघटनेचे काही सदस्य सहभागी झाले होते.

सदस्यांना फंड उभारण्याची जबाबदारी

या बैठकीत काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्यांबाबत चर्चा झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत पक्षाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्व नेत्यांना पक्षाच्या आर्थिक स्थितीची माहिती देण्यात आली. तसेच सर्व सदस्यांना फंड उभारण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. काँग्रेसच्या एका नेत्यानेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या बैठकीत आर्थित स्थितीवर चर्चा करण्यात आल्याचं या नेत्यानं सांगितलं. तसेच दिल्लीत तयार होत असलेल्या पक्षाच्या मुख्यालयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून मुख्यालयाचं काम सुरूच असून अद्यापही ते पूर्ण न झाल्याने काँग्रेस नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

काँग्रेसची निदर्शने

दुसरीकडे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असून त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर सातत्याने टीकास्त्र सोडलं आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र काँग्रेसने या मुद्द्यावरून जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. तसेच इंधन दरवाढीसह कृषी कायद्यांच्या विरोधातही काँग्रेसकडून आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भोपाळ काँग्रेसने अर्ध्या  दिवसाच्या बंदचीही हाक दिली होती.

महागाई वाढतच आहे. त्यामुळे गरिबांच्या घरखर्चात वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्र्याने श्रीमंतावर एका पैशाचा तरी कर लादलाय का? संपूर्ण पैसा गरिबांच्या खिशातून खेचला जात आहे. सेंट्रल एक्साईज ड्युटी कमी करावी ही आमची मागणी आहे. डिझेलवर सेंट्रल एक्साईज ड्युटी १० टक्के तर पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी ५ टक्क्यांनी  वाढवली आहे. २०१४ मध्ये जे पेट्रोल-डिझेलचे भाव होते तेच ठेवा. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER