भाजपासारखा तडीपार अध्यक्ष काँग्रेसमध्ये नाही : भाई जगताप

नागपूर : काँग्रेसचे आत्तापर्यंत ७२ अध्यक्ष झाले. मात्र, त्यात भाजपासारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता, असा टोला आज काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना लगावला आहे.

आज विधानपरिषदेत धुळे येथील राईनपाडा येथील डवरी गोसावी समाजाच्या चार जणांच्या हत्येप्रकरणावर सुरू असलेल्या अल्पकालीन चर्चेदरम्यान हा गोंधळ उडाला. धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणात भारतीय संविधानामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले, असे वक्तव्य केले होते. या एका वक्तव्याचा आधार घेत भाजपा आमदार भाई गिरकर यांनी काँग्रेसच्या संविधानात दुसऱ्यांना अध्यक्ष करण्याची तरतूद नसल्याचे वक्तव्य केले.

यावर उत्तर देताना काँग्रेसचे भाई जगताप म्हणाले की, आजवर काँग्रेसचे ७२ अध्यक्ष झाले, त्यात केवळ चार गांधी घराण्यातील होते. मात्र,बाकी सर्व विविध जाती धर्म आणि पंथांचे होते. पण त्यात भाजपासारखा एकही तडीपार अध्यक्ष नव्हता, असे म्हटले.

भाई जगताप यांच्या या आरोपावर भाजपाच्या अनेक सदस्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र ,उपसभापतींनी त्यांना बोलण्याची संधी दिली नाही. तर काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल वक्तव्य करणारे भाजपाचे सदस्य भाई गिरकरही पुढे जगताप यांच्या विधानावर उत्तर देऊ शकले नाहीत.