…काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका योग्यरीत्या पार पाडू शकत नाही- पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था बिकट आहे. चीनसोबतही दररोज चकमकीचे वृत्त येत आहे. याव्यतिरिक्तही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत; पण पक्षाकडे पूर्णवेळ नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेस (Congress) विरोधी पक्षाची भूमिका योग्यरीत्या पार पाडू शकत नाही, असे माजी मुख्यमंत्री व राज्यातील वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणालेत. या वक्तव्यातून पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते एका वाहिनीशी बोलत होते. ७ ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना काँग्रेसच्या काही नेत्यांनी – पक्षासाठी पूर्णवेळ अध्यक्षाची निवड करा, असे पत्र लिहिले होते.

या पत्रावर पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्वाक्षरी केली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात चव्हाण म्हणाले की – २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत अचानक अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अध्यक्षपद सोडण्याचे नुकसान असे झाले की, पक्ष निवडणुकीतील पराभवाची समीक्षाच करू शकला नाही! त्यावेळी आमच्याकडे नेतृत्वच नव्हते. त्यानंतर सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष झाल्या.

परंतु त्यांची प्रकृती पाहता त्या कायम कार्यरत असतील आणि कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहतील, अशी अपेक्षा करता येणार नाही. आम्हाला अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात यश मिळाले. परंतु कर्नाटक आणि मध्यप्रदेशात सरकार टिकवता आले नाही. म्हणून आम्ही पक्षाला पूर्णवेळ नेतृत्वाची गरज असल्याचा विचार केला आणि आमचे म्हणणे पक्षापुढे मांडले.

काही नेत्यांना सोनिया गांधी यांची भेट घ्यायची होती. परंतु त्यांना भेटण्याची वेळ देण्यात आली नाही, म्हणून ७ ऑगस्ट रोजी आम्ही पत्र लिहून आमचे म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. आम्ही गांधी कुटुंबीयांबाहेरील व्यक्तीला अध्यक्षपदी निवडण्याची मागणी केली नव्हती. म्हणूनच हे पत्र गांधी कुटुंबीयांविरोधातील असल्याचे सांगत प्रचार करण्यात आला.

राहुल गांधी तयार असल्यास चांगले

“राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार असतील तर यापेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. परंतु, त्यांना पक्षाचे नेतृत्व करायचे नाही. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत. म्हणून आम्ही वर्किंग पार्लियामेंट बोर्डाची मागणी केली होती. हे बोर्ड गेल्या अनेक वर्षांपासून नाही. त्या मागणीत काही गैरही नाही.” असे ते म्हणालेत.

चर्चेची अपेक्षा होती

कार्य समितीच्या बैठकीत पत्रावर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. परंतु या बैठकीत पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या केवळ चारच नेत्यांना बोलावण्यात आले. त्यामुळे यावर चर्चा होऊ शकली नाही. आमच्यावरच आरोप करण्यात आले. अनेक नेत्यांनी पत्र न वाचताच टीका केली, असे चव्हाण म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER