‘काँग्रेस दलालांचा दलाल!’ कृषी कायद्यांवरून प्रकाश जावडेकरांची टीका

Prakash Javadekar

पणजी : कृषी कायद्यांना विरोध करणारा काँग्रेस हा दलालांचा पक्ष आहे, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. ते म्हणाले की, देशात कृषी सुधारणा विधेयक आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसचाच होता. आता या कायद्यांना जो विरोध चालला आहे, तो राजकीय आहे. केंद्रात संमत झालेल्या कृषी कायद्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच इतर विरोधी पक्षांकडून जो विरोध होतो आहे, त्यावर केंद्राची बाजू मांडण्यासाठी ५० मंत्री देशभरात दौऱ्यावर आहेत. त्याच मोहिमेत जावडेकर शुक्रवारी सायंकाळी गोव्यात आले होते.

आज त्यांनी पर्वरी येथे पत्रकार परिषद घेतली. तिन्ही कृषी कायद्यांचे समर्थन करताना जावडेकर म्हणाले, शेतकऱ्यांची कृषी उत्पादकता वाढावी, कृषी मालाचा दर स्वतः शेतकऱ्यांना ठरविता यावा, शेतकी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक व्हावी, कृषिमाल निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, शेतजमिनीची मालकी शेतकऱ्यांकडेच रहावी या उद्देशाने ही विधेयके संमत केलेली आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा अधिकाधिक फायदा होईल आणि दलाल नेस्तनाबूत होतील. नवनवे तंत्रज्ञान या क्षेत्रात येईल. शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढेल. देशातून अधिकाधिक निर्यात व्हावी, अशी अपेक्षा आहे.

कृषिमालाची साठवणूक करता येईल तसेच निर्यातीवर निर्बंध राहणार नाहीत. साठेबाजीमुळे बाजारात कृषिमालाचे दर वाढणार नाहीत का? या प्रश्नावर जावडेकर म्हणाले की, मुबलक उत्पादन होणार असल्याने टंचाई निर्माण होण्याचा किंवा दर वाढण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस दलालांची तळी उचलून धरते आहे. म्हापसा येथे जावडेकरांना काळे झेंडे दाखवण्यात आलेत. याचा उल्लेख करून ते म्हणाले की, आंदोलन करणारे खरोखरच शेतकरी होते की काय, हा प्रश्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी राजकीय स्वार्थासाठी आंदोलन करत आहेत.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आधी स्वतःच्या पक्षाचा २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणूक जाहीरनामा तपासावा. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांची कृषी सुधारणांवरील भाषणे ऐकावीत. या प्रश्‍नावर कॉंग्रेस आता ‘यू-टर्न’ घेते आहे. राज्यसभेत ही विधेयके संमतीसाठी आली तेव्हा काँग्रेसच्या खासदारांचे वर्तन आक्षेपार्ह होते. देशातील ६० टक्के लोक कृषी क्षेत्राशी संबंधित आहेत आणि एकूण सकल उत्पन्न केवळ १० ते १५ टक्के एवढेच आहे, ते वाढायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER