बाळासाहेबांचे नागरिकत्व हिसकावणाऱ्यांनी न्यायाची भाषा बोलू नये! – पंतप्रधान

Modi-Balasaheb

लातूर :- काँग्रेसने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नागरिकत्व हिसकावून घेतलं होतं तसेच त्यांचा मतदानाचा अधिकारही काढून घेतला होता. त्यामुळे न्यायाची भाषा वापरणाऱ्या काँग्रेसने स्वत:चं तोंड आरशात बघावं, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लातूरमधील औसा इथं आज शिवसेना-भाजप युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : महाआघाडीत हिंमत असेल तर, पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावे – उद्धव ठाकरे

वादग्रस्त प्रचारामुळे जुलै १९९९ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा आणि निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार सहा वर्षांसाठी काढून घेतला होता. त्यानंतर बाळासाहेबांनी २००६ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार बजावला होता. अशी आठवणही त्यांनी काढून दिली. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी घराणेशाही आणि गटबाजीमध्ये अडकून पडले आहेत. काँग्रेस एकाच परिवाराच्या विकासात लागले आहे. या पक्षांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलं पाहिजे. बाळासाहेब स्वत: मुख्यमंत्री होऊ शकले असते. उद्धव ठाकरे यांनादेखील मुख्यमंत्री ते करू शकले असते; पण ते त्या मार्गावर नाही गेले. देशातील घराणेशाही पाळणाऱ्या पक्षांनी बाळासाहेबांकडून शिकावं.’ असेही ते म्हणाले.

जनतेवर असलेला विश्वास हीच गेल्या पाच  वर्षांची माझी कमाई आहे. सशक्त भारत बनवण्याचा संकल्प आम्ही समोर ठेवला आहे. एकीकडे आमची नीती आणि नियत आहे, दुसरीकडे विरोधकांचा दुटप्पीपणा आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा नाही मात्र, शरदराव तुम्हाला हे शोभतं का? – मोदी