भगिरथ भालकेंच्या प्रचारात काँग्रेस, शिवसेना दिसेना

Bhagirath Bhalke

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला आहे. प्रचार संपायला दोन-तीन दिवस बाकी असताना राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारात काँग्रेस व शिवसेनेचा एकही बडा नेता दिसलेला नाही. मुंबई वा राज्याच्या अन्य भागातून या दोन पक्षांचा एकही नेता भालकेंच्या प्रचारासाठी फिरकलेला नाही. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील तिन्ही पक्ष यापुढील निवडणुका एकत्रितपणे लढणार असल्याचा उच्चार तिन्ही पक्षांच्या नेते करीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत, शिवसेनेला आपल्याला सांभाळून घ्यायचे आहे असे विधान केले होते. तेव्हापासून राज्यात यापुढे राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रितपणे निवडणुका लढवतील असे म्हटले जात होते. मात्र पंढरपुरात वेगळाच अनुभव येत आहे. शिवसेना जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या शैला गोडसे यांनी बंडाचे निशाण फडकविले असून त्या अपक्ष लढत आहेत. काँग्रेस वा शिवसेनेचे राज्यस्तरावरील नेते तर सोडाच स्थानिक नेतेदेखील भगिरथ भालके यांच्या प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भगिरथ यांच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत.

भाजपचे उमेदवार समाधान अवताडे  यांच्यासाठी आ.प्रशांत परिचारक आणि त्यांचा पूर्ण परिवार संपूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार प्रचारसभा घेतल्या. महाविकास आघाडीसोबत आतापर्यंत असलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सचिन शिंदे पाटील यांना उमेदवारी दिली असून त्यांनीही ताकद पणाला लावली आहे. चुलत भाऊ सिद्धेश्वर अवताडे यांनी केलेली बंडखोरी ही समाधान अवताडे यांच्यासाठी डोकेदुखी आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमेदवार भारत भालके यांना ८९७८७ मते मिळाली होती. भाजप-शिवसेनेचे सुधाकरपंत परिचारक यांना ७६४२६ मते मिळाली होती. भालके हे १३३६१ मतांनी विजयी झाले होते. परिचारक हे अत्यंत ज्येष्ठ नेते. भारत भालके आणि सुधाकरपंत परिचारक यांचे गेल्यावर्षी कोरोनाने निधन झाले. पंढरपूरच्या राजकारणावर प्रचंड पगडा असलेले दोन नेते काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होत आहे. सुधाकरपंत हे पाचवेळा तर भालके हे तीनवेळा आमदार होते. आता भालके यांचे पुत्र भगिरथ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्याच आठवड्यात निधन झाले. महिना दीड महिन्यात तिथेही विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. अंतापूरकर यांनी २०१९ मध्ये शिवसेनेचे तत्कालिन आमदार सुभाष साबणे यांचा पराभव केला होता. यावेळी ही जागा काँग्रेस नक्कीच लढवेल. अशावेळी शिवसेनेची काय भूमिका असेल? या बाबत उत्सुकता राहील. अंतापूरकर हे २० हजारावर मतांनी विजयी झाले होते पण साबणे यांनी तब्बल ६७ हजार मते घेतली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जागा सोडेल का हा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button