मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत बिघाडी ?

Congress-NCP

मुंबई :- लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतांना दिसून येत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी पक्षसंघटनेसोबत मतदार संघाची निवड करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने समविचारी पक्षांनासोबत घेऊन आघाडी करत भाजप सेनेला शह देण्याचा निर्धार केला आहे. मात्र आता मुंबईतल्या जागांववरून आघाडीमध्ये तीव्र मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतलं जागावाटप समसमान पातळीवर व्हावं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांच म्हणण आहे. तर राष्ट्रवादीची मुंबईत ताकदच नाही तर अर्ध्या जागा द्यायच्या कशा ?, असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा एकदा आघाडी करत विधानसभा निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भाजप–सेनेला पराभूत करण्याचा निर्धार केला असला तरी, कॉंग्रेस आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद घातला जात असल्याच दिसत आहे. जागावाटपाच्या चर्चेत गोंधळ घातला जातोय अशी तक्रार दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. चर्चेत केवळ जातो आणि निवडणुकीच्या तयारीसाठी जास्त कालावधी मिळत नाही असं या नेत्यांचं म्हणणं आहे.