मराठ्यांबाबत काँग्रेसने नेहमी केले कपट; चंद्रकांत पाटील यांची टीका

Chandrakant Patil - Congress

मुंबई :- कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी महामंडळाची घोषणा केली. त्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टीका केली.  यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी काँग्रेसवर, मराठा समाजाबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी कपटाचीच राहिली आहे, अशी टीका केली.

पाटील म्हणालेत – काँग्रेसने ना कधी मराठा समाजाच्या हिताचा विचार केला ना मराठा समाजासाठी काही चांगले काम. मराठा समाजाबाबत काँग्रेसची भूमिका नेहमी कपटाचीच राहिली आहे. काँग्रेस, मग ती महाराष्ट्राची असो किंवा कर्नाटकची, दिल्लीची असो किंवा इटलीची, भारत आणि भारतीयांच्या विकासाचा शत्रू राहिली आहे.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मराठा आरक्षण हा विषय आता न्यायालयात असल्याने याबाबत काय निकाल लागणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. कर्नाटकमधील भाजपा सरकारने तेथील मराठा समाजासाठी महामंडळ स्थापन केले. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी महामंडळाची घोषणा करत असताना पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांची तरतूद केली. त्यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी टीका केली. त्यांच्या याच टीकेवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले.

ही बातमी पण वाचा : वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी, काँग्रेसला मिळत नाही अपेक्षित निधी

चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक आणि ट्विटरवर पोस्ट लिहून ही टीका केली. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले – काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये राहणाऱ्या मराठा बांधवांच्या हितार्थ त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा  यांनी एका महामंडळाची घोषणा केली असून त्यांच्यासाठी ५० कोटी रुपये केवळ जाहीर केले नाहीत तर त्यांचे वाटपदेखील केले. आज काँग्रेस पक्षाचे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते सिद्धरामैया  यांनी येडियुरप्पा यांच्या या निर्णयाचा विरोध केला.

सिद्धरामैया म्हणाले की, कन्नड आणि मराठी लोकांमध्ये गेल्या काही काळापासून वाद सुरू असल्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी लोकांसाठी केलेले कोणतेही काम योग्य ठरणार नाही. सिद्धरामैया यांच्या मते, यामुळे कन्नड लोकांच्या भावना दुखावल्या जातील. सुरुवातीपासूनच महाराष्ट्रातदेखील काँग्रेसचा मराठ्यांबद्दल असाच स्वभाव पाहायला मिळाला आहे. आधी सरकारने काही न काही घोळ करून आरक्षणात अडचणी निर्माण केल्या, त्यानंतर ‘सारथी’ला नुकसान पोहचवून अण्णासाहेब पाटील महामंडळसुद्धा बरखास्त करून टाकले.

काँग्रेस पक्ष भलेही महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकचा, दिल्लीचा असो वा इटलीचा… सर्वच भारत आणि भारतीयांच्या विकासाचे शत्रू आहेत. सिद्धरामैया यांच्या या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अगदी चिडीचूप, मुक्या-बहिऱ्यासारखे पाहात राहतील. यांनी ना कधी मराठा समाजाच्या हिताचा विचार केला आहे ना मराठा समाजासाठी काही चांगले काम. सत्तेची लाचारी… काँग्रेस विचारांनीसुद्धा भ्रष्टाचारी ! असा टोमणा पाटील यांनी काँग्रेसला मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER