नोबेल विजेत्या बॅनर्जींचे अभिनंदन पण त्यांचा विचार भारताने नाकारलेला

-पियूष गोयल यांची टीका

PIYUSH-GOYAL

पुणे (प्रतिनिधी) :- ‘‘भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पारितोषिक मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र ते डाव्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांचा हा डावा विचार भारताने केव्हाच नाकारलेला आहे. या डाव्या विचारांना भारतात थारा नाही,’’ अशी टीका रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी बॅनर्जी यांच्यावर केली. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनाही अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टी समजत नाहीत, असेही गोयल म्हणाले.

विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पुण्यात आलेले गोयल शुक्रवारी (ता. 18) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार गिरीश बापट, भाजपाचे शहर सरचिटणीस गणेश बीडकर, उज्वल केसकर आदी यावेळी उपस्थित होते. नोबेल विजेते अभिजित बॅनर्जी म्हणाले, की नोबेल विजेते बॅनर्जी कोणत्या विचारांचे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते डाव्या विचारांचे आहेत. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेल्या न्याय योजनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र या बॅनर्जींच्या डाव्या विचारांना भारताने कधीच स्विकारलेले नाही.

ही बातमी पण वाचा : प्रचारातील सोनिया, प्रियांकाच्या अनुपस्थितीने काँग्रेसमध्ये कुजबूज

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही गोयल यांनी टीका केली. डॉ. मनमोहनसिंग यांना अर्थशास्त्रातील प्राथमिक गोष्टीही माहिती नसल्याचे दिसते. त्यांच्याच काळात अनेक घोटाळे झाले. नेतृत्वाच्या भीतीने त्यांनी त्यावर निर्णय घेतले नाहीत. एक-दोन नव्हे तर कोट्यवधी रूपयांचे घोटाळे झाले तरी त्यांनी काही केले नाही. त्यांनी देशाला लाचारीच्या अवस्थेत सोडले होते. आम्ही गेल्या पाच वर्षात देशाला समर्थ केले, मात्र तेही त्यांना समजत नाही याचे आश्चर्य वाटते. त्यांच्या काळात व्याजदर कमी होता. त्यात आम्ही वाढ केली. देशहित सोडून ते पक्षहित पाहात असल्याने उद्योग तसेच अर्थव्यवस्थेचेही हानी झाली होती, असे गोयल म्हणाले.

भारतीय रेल्वेच्या खासगीकरणाची शक्यता गोयल यांनी पूर्णतः खोडून काढली. ते म्हणाले, की भारतीय रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. त्याचे कधीही खासगीकरण केले जाणार नाही. याबाबतच्या बातम्या निराधार आहेत. कॉंग्रेस सरकारच्या काळात रेल्वेची वाढ झाली नाही. आम्ही ती केली. गुंतवणूक वाढवली. अर्थव्यवस्थाही आम्ही सुदृढ करणारच. जागतिक परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. पाच ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेतील एक ट्रिलियन महाराष्ट्राचे असतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला. गुरूवारी पुण्यात झालेल्या मोदी यांच्या सभेचाही त्यांनी उल्लेख केला व राज्यात युतीचेच सरकार परत येईल असा विश्वास व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : ‘माझा चेहरा हेच माझे चिन्ह’ – कोथरुडमधल्या उमेदवाराची भूमिका