संत नामदेव जयंतीची राज्य सरकारला आठवण दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन : भाजपा आध्यात्मिक आघाडी

Acharya Tushar Bhosale-Fadnavis

श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी श्री संत नामदेवांचे प्रतिमा पूजनही केले नव्हते तथापि यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाने कोणताही कार्यक्रमदेखील ठरवला नव्हता; परंतु वारकरी संप्रदायाचे पाईक आणि संतसेवक असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १५ डिसेंबरला  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत श्री संत नामदेव महाराजांचे ७५० वे जयंती वर्ष महाराष्ट्र शासनाने साजरे करावे, अशी मागणी केली.  या मागणीचे आम्ही स्वागत करतो तसेच राज्य सरकारला जयंतीची आठवण करून दिल्याबद्दल  देवेंद्र  फडणवीस यांचे विशेष अभिनंदन करतो, असे भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी विधानसभेत पुढील मुद्दे मांडले :
● “महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राचे महान संत, भक्त शिरोमणी श्री संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका महाराष्ट्राबाहेर आणि देशभरात सर्वदूर पंजाबच्या घुमानपर्यंत नेली. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेले संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायासह सबंध महाराष्ट्राचे वैभव आहेत. अशा थोर संत नामदेवांचे हे ७५० वे जयंती वर्ष आहे. त्यांचा जन्म दि. २६ ऑक्टोबर १२७० रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसी या ठिकाणी झाला. घुमान येथे झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात आपण गेलो होतो. पंजाब प्रांतात फार मोठा आदर आणि सन्मान संत नामदेवांबद्दल आहे , हे आपण पाहिले आहे.
● नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगीं ॥ असा संदेश देणाऱ्या संत नामदेवांच्या ७५० व्या जयंती निमित्ताने महाराष्ट्र सरकारने :
१) पंढरपूर येथे संत साहित्याच्या अभ्यासक्रमावर आधारित “संतपीठ” उभारण्याचा निर्णय भाजपा सरकारच्या काळात घेतला होता; मात्र ते काम सध्या थांबले आहे; यानिमित्ताने आपण ते सुरू  करावे.
२) कीर्तन-प्रवचनांतून समाज प्रबोधन करणाऱ्या मंडळींना संत नामदेवांच्या नावे पुरस्कार देऊन सन्मानित करावे.
३) त्यांच्या जन्मगावी नरसी नामदेव या ठिकाणी भाजप सरकारच्या काळात भरीव अनुदान दिले आणि त्याचे कामही सुरू झाले आहे; पण आता या जयंतीनिमित्ताने आपण अजून भरीव अनुदान देऊन या क्षेत्राचा विकास करावा.”

देवेंद्र  फडणवीस यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र विधानसभेत केलेल्या मागणीचे आम्ही स्वागत करतो आणि याबद्दल त्यांचे खूप खूप आभारदेखील मानतो. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की, त्यांनी ही मागणी अगत्याने पूर्ण करावी.

(श्रीमती मेघना आंबेकर)
प्रसिद्धी प्रमुख
भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER