काँग्रेस अजूनही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : राज्यपालांच्या निर्णयानंतरच भूमिका स्पष्ट करू

मुंबई :- राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेसने अद्यापही त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीत. राज्यपाल आता काय निर्णय घेतात, याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. राज्यपालांच्या निर्णयाकडे आम्ही लक्ष ठेवून असून राज्यपालांच्या निर्णयानंतरच आम्ही भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस या वेट अँड वॉचच्या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांनी आज सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन सुमारे दोन ते अडीच तास चर्चा केली. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : पवारांनी सोनियांना दिले, काँग्रेस आणि सेनेच्या संबंधाचे पुरावे; काँग्रेसचा पाठिंबा मिळणार?

महायुतीला जनादेशही होता. पण फडणवीस यांनी राजीनामा दिला, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्र्यांचे त्यानंतरच निवेदन आम्ही ऐकलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदही आम्ही उत्सुकतेने ऐकली, असे थोरात म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन्याचे निमंत्रण स्विकारण्यासाठी राज्यपालांना भेटायला गेलेत असे आम्हाला वाटले होते, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेला पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यावर चर्चाही केली नाही. तसेच पुढे काय करायचं याची निश्चित रणनीतीही तयार केलेली नाही. आमचं सर्व लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागलेलं आहे. राज्यपाल काय भूमिका घेतात यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यानंतरच आम्ही पुढचा निर्णय घेऊ, असं ते म्हणाले.

बिगर भाजप सरकार यावं ही आमचीही इच्छा आहे. पण ती कल्पना कशी सत्यात उतरेल? असा सवालही त्यांनी केला. माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनीही राज्यपालांच्या निर्णयानंतरच भूमिका घेऊ असे सांगितलं.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, फडणवीस यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील अस्थिरता संपुष्टात आली आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच त्यांना जनतेने नाकारले आहे. राज्यात २२० ते २२५ जागा जिंकू असा दावा त्यांनी केला होता. हा दावा फोल ठरल्याचे त्यांनी आज १५ दिवसानंतर कबूल केले आहे. आता तोडाफोडी करूनही राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, हे फडणवीस यांना कळून चुकले आहे, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.