काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या गुन्हाखाली अटक

अहमदाबाद : गुजरातमधील काँग्रेस नेता हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अहमदाबादमधील चिरमगांव येथे ही अटक केली. शनिवारी न्यायालयाने हार्दिक पटेलविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. 24 जानेवारी रोजी हार्दिक पटेल यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हार्दिक यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हार्दिक पटेल यांच्या सभेनंतर ऑगस्ट २०१५ मध्ये पाटीदार आंदोलकांच्या आंदोलनादरम्यान गुजरातच्या विविध भागांत हिंसाचार पेटला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात तोडफोडही करण्यात आली होती. याप्रकरणी हार्दिक पटेल यांच्यावर ऑक्टोबर २०१५ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हार्दिक पटेल याप्रकरणीच्या सुनावणीला वारंवार अनुपस्थित राहत असल्यामुळे अहमदाबादमधील एका कोर्टाने त्यांच्याविरोधात आज अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला. वॉरंट जारी झाल्यानंतर पोलिसांनी लगेच हार्दिक पटेल यांना ताब्यात घेतले आहे.