‘आपण हार मानत नाही !’ पार्थच्या नव्या ट्विटने संभ्रम

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पवार कुटुंबात सध्या पार्थमुळे वादळ उठले आहे. पार्थ पवारने (Partha Pawar) आधी विरोधकांच्या सुरात सूर मिसळत सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करणे, त्यानंतर आजोबा शरद पवारांनी (Sharad Pawar) राम मंदिर निर्माणावरून केंद्र सरकारला जाहीर टोला लगावला असताना पार्थ यांनी पवारांच्या विरुद्ध भूमिका घेत जय श्री रामचा नारा देणे, यामुळे पवार कुटुंबात महाभारत रंगले आहे. त्यातच आता पार्थ पवार यांनी केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.

पार्थ यांनी केलेल्या ट्विटचे विविध अर्थ लावले जात आहेत. एकीकडे वडील अजित पवार (Ajit Pawar) यांनी पार्थ लहान आहे म्हणून शरद पवारांकडे लेकाची पाठराखण करत असल्याचे सांगण्यात येते तर दुसरीकडे पार्थसुद्धा ट्विटमध्ये आपण हार मानत नाही, असे लिहितोय. यातून अनेक अर्थ लावले जात आहेत.

पार्थ पवार अपरिपक्व असल्याची शरद पवार यांनी टिप्पणी केली असली तरी, पार्थ यांची भूमिका सध्या पवार कुटुंबीयांत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पवार कुटुंबातील ज्येष्ठ सध्या पार्थ यांची समजूत काढण्याच्या कामी लागले आहेत. एवढेच नाही तर पार्थने राम मंदिरासंदर्भात केलेली विधाने पक्षाच्या भूमिकेशी विसंगत आहेत. विशेषत: एका विशिष्ट समुदायाबद्दल केलेले विधान तर अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे प्रकार वेळीच थांबवले पाहिजेत, नाही तर ज्या भूमिकेवर आपण पक्ष उभा केला, त्या भूमिकेला तडा जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर पार्थ अजून लहान आहे. तो हळूहळू तयार होईल, अशी सारवासारव अजित पवारांनी केली. मात्र, त्याला असे जाहीरपणे बोल लावणे योग्य नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. काका-पुतण्याच्या या संवादावेळी तिथे उपस्थित असलेले जयंत पाटील (Jayant patil) यांनी पार्थची आपण समजूत काढू, असे असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पार्थ यांच्या एका ट्विटने पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. पार्थ यांच्या या ट्विटने अनेकजण संभ्रमात पडले आहेत. ‘कोरोनाच्या लढ्यात आपण सगळे कष्ट करत आहोत, यातून चांगलेच काहीतरी निघेल. महाराष्ट्राचे हे स्पिरीट आहे. आपण हार मानत नाही’ अशा आशयाचे ट्विट केले. सोबत त्याने गणरायाची मूर्तीही जोडली होती. मात्र, त्या ट्विटमधील ‘आपण हार मानत नाही’ या वाक्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

ही बातमी पण वाचा : अजितदादा शरद पवारांना म्हणाले, ‘पार्थ लहान आहे, समजून घ्या !’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER