शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम

School

पुणे : माध्यमिक शाळा (School), कनिष्ठ महाविद्यालये (Junior Colleges) टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत त्या त्या जिल्हाधिकार्‍यांनी निर्देश दिले आहेत. तशी शिक्षण संस्थांकडून तयारी सुरू झाली असून लवकरच शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण होणार आहेत. शाळा सुरू करण्याच्या वेगवेगळ्या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा गोंधळ उडाला आहे. तर राज्य सरकारने स्थानिक पातळीवर निर्णय सोडल्याने संभ्रम असून 7 डिसेंबरपर्यंत शाळांची घंटा वाजणार का, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

कोरोनाच्या (Corona) पार्श्‍वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद आहेत. शासन निर्णयानुसार 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्था चालकांनी घाईगडबडीने शाळा सुरू करू नयेत. तयारी पूर्ण झालेल्या शाळांनी पालकांचे संमतीपत्र घेऊन शाळा सुरू कराव्यात, असे सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शाळा नेमक्या कधी सुरू होणार याची शाश्वती नाही. दरम्यान शाळा सुरू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर वर्गखोल्या निर्जंतुकीकरण, स्वच्छतेचे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे संमतीपत्र पालकांकडून घेतले जात असून बहुतांश पालकांनी अद्यापही संमतीपत्र दिलेले नाही. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या शक्यतेने संमतीपत्र देण्यास पालक तयार नसल्याचे दिसत आहे. काही विद्यार्थी व शिक्षक अद्याप गावी आहेत. कोरोना संसर्गाची भीती असून या काळात शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणार नाही. त्यामुळे संसर्ग होऊन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांमुळे पालक व शिक्षकांना कोरोना झाल्यास जबाबदार कोण,असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांच्याकडून संमिश्र मते व्यक्‍त केली जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER