
कोल्हापूर :- अचानक कामावरून कमी केल्यामुळे सुभद्रा लोकल एरिया बँक कर्मचाऱ्यांनी (Subhadra Local Bank employees) बॅंकेसमोर निषेध करत आज गोंधळ घातला. जोपर्यंत नोटीस परत घेतली जात नाही तोपर्यंत बँक उघडू देणार नाही, अशी भूमिका घेत कर्मचाऱ्यांनी बँक व्यवस्थापकाला धारेवर धरले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने याबाबत गुरुवार २४ डिसेंबर रोजी माहिती दिली आहे. बँकेचे व्यवहार आणि कामगिरी भविष्यात ठेवीदारांच्या हिताचे नुकसानकारक ठरेल अशी होती. त्यामुळे आरबीआयने ही कारवाई केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुभद्रा लोकल एरिया बँकेने २०१९-२०२० या आर्थिक वर्षातील दोन तिमाहीमध्ये किमान नेटवर्थच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याने आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे.
२४ डिसेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने सुभद्रा लोकल एरिया बँक कोल्हापूर शाखेचा परवाना रद्द केला आहे. यामुळे बँकेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र ४ जानेवारी रोजी बँकेतील जवळपास ३० हून अधिक कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्या नोटिसी बजावण्यात आल्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तीन महिन्यांचा पगार घेऊन कामावरून कमी व्हावा, असे आदेश त्यात देण्यात आले आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. बँकेवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू असताना व्यवस्थापकाने दिलेल्या नोटिसा आम्हाला मान्य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी बँकेच्या दारात गोंधळ घातला.
बँकेत जवळपास ५० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना बँकेने कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांना अशी नोटीस का नाही? त्यांना वेगळा न्याय? मग आम्हाला वेगळा का? अशी भूमिका बँक कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापकाकडे मांडली आहे. आरबीआयकडून प्रशासकीय नेमणूक झाली नसताना बँक व्यवस्थापकाने हा निर्णय घेतला कसा? जोपर्यंत आरबीआय प्रशासकाची नेमणूक होत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये तसेच सर्वच कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीच्या नोटीस द्या, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला