सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे यांचे फोटो नसल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

जयंत पाटलांच्या सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मागितली माफी

Solapur

सोलापूर : सोलापूर शहरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या (Graduate and Teacher Constituency Elections) प्रचारासाठी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उदय सामंत, बंटी पाटील, दत्तात्रेय भरणे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या फलकावर सुशीलकुमार आणि प्रणिती शिंदे यांचे फोटो नसल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ केला.

या प्रचार सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. तसंच, उदय सामंत, बंटी पाटील, दत्तात्रेय भरणे इत्यादी मंत्रीही हजर होते. महाविकास आघाडीची सभा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे या सभेला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

पण, अचानक या सभेत काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. सभेच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर ‘महाविकास आघाडीची प्रचार सभा’ असे लिहिले होते. पण, पोस्टरवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचा फोटो नव्हता. हा प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ आहे. यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले होते. व्यासपीठाकडे धाव घेऊन घोषणा सुरू केल्या.

कार्यक्रमात गोंधळ उडाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून महिला कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, ‘महाविकास आघाडी म्हणता आणि आमच्याच नेत्याचा फोटो का नाही लावला?’ असा सवाल करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजकांना चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘निषेध निषेध’च्या घोषणा दिल्या.

काही वेळ कार्यक्रम थांबवण्यात आला. नाराज कार्यकर्ते निघून गेलेत. अखेर, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जाहीर माफी मागण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी व्यासपीठावरून कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हात जोडून माफी मागितली. रविवार असल्यामुळे अचानक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्याधिकाऱ्यांकडून एका दिवसात परवानगी घेण्यात आली. या धावपळीत फोटो लावण्यास विसरल्याची कबुली राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षांनी दिली. अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर सभा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER