गोंधळलेला राजा आणि बेफिकीर प्रशासन

CM Uddhav Thackeray - Remdesivir - Coronavirus Maharashtra - Editorial

Shailendra Paranjapeसरकारी पातळीवरची बेफिकिरी आणि अकार्यक्षमता कोणत्या स्तराला गेलीय, हे दाखवणारं एक सत्य पुण्यामध्ये एका बातमीनं समोर आणलंय. अर्थात, हल्ली सरकारशी संबंधित बातम्या, आरोप-प्रत्यारोप या सर्वांमध्ये रोज नवनव्या गोष्टी बाहेर येतच आहेत. त्यातून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येत आहे आणि ती म्हणजे कुणाचा पायपोस कुणाला नाही, अशी स्थिती आहे.

रेमडेसिवीरच्या तुटवड्यानंतर कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची शहरात सगळीकडे धावाधाव होत असल्याच्या आणि या इंजेक्शनच्या काळ्या बाजाराच्या बातम्या सर्व वृत्तपत्रांतून टीव्ही वाहिन्यांवरून झळकल्या. त्यामुळे रेमडेसिवीर देताना कोरोना रुग्णाची माहिती, प्रिस्क्रिप्शन घेतले जाऊ लागले आणि ते रुग्णालयाच्या लेटरहेडवरून देण्याची सक्ती करण्यात आली. रेमडेसिवीर इंजेक्शन हवे असल्यास कोविड रुग्णावर उपचार करत असल्याबद्दल संबंधित सरकारी यंत्रणेचे पत्र आणि त्याबरोबरच आपल्या रुग्णालयातली आयसीयू तसेच ऑक्सिजन खाटांची संख्या सरकारी पोर्टलवर टाकण्याचे बंधन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व रुग्णालयांवर टाकले. त्यामुळे रेमडेसिवीर हवे तर ही माहिती अधिकृत पोर्टलवर यायला हवी आणि त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून परवानगीही हवी, यातून सरकारी पोर्टलवर गेल्या १५ दिवसांत पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांची संख्या २९९ वरून २४१ ने वाढून ५४० वर गेलीय तर पुणे शहर आणि जिल्ह्यात असलेल्या आयसीयू-प्राणवायू खाटांची संख्या सात हजारांवरून ५ हजार २९६ ने वाढून १२ हजार २९६ वर गेलीय.

मुळात कोरोना (Corona) गेल्या वर्षीपासून आहे आणि गेल्या वर्षीही रेमडेसिवीरचा काळाबाजार, प्राणवायूचा तुटवडा, हे सारे अध्याय जनतेने पाहिलेले आहेत. असे असताना आता कोरोनाची दुसरी तीव्र लाट आल्यानंतर रेमडेसिवीरचा काळाबाजार, प्राणवायूचा तुटवडा, त्यासाठी अगदी केंद्र सरकारच्या पातळीवरून विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले जात आहे. अशा वेळी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या २४१ रुग्णालयांची माहितीच सरकारी यंत्रणेला नसावी, ही गोष्ट धक्कादायक आहे आणि म्हणूनच सरकारी पातळीवरची बेफिकिरी आणि अकार्यक्षमताच या घटनेने उघड झाली आहे.

रेमडेसिवीरच्या इंजेक्शन्स (Remdesivir) मागवल्याच्या प्रकारावरून राज्यपातळीवर राजकीय धूळवड सुरू आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil), मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) हे मंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Praveen Darekar) तसेच पक्षीय पातळीवर काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP), भाजपा (BJP) हे सारे यात हिरिरीने भाग घेताहेत. राज्याबाहेरून रेमडेसिवीर आणली जाणे आणि त्याचा श्रेयवाद, त्यावरून राजकारण हे सारं जनतेसाठी उबग आणणारंच आहे. हे सारं होतंय; कारण मुळात राज्यातलं सरकार खंबीर नाही. सरकार खंबीर नसल्याने कुणाचा कुणाला पायपोस नाही आणि म्हणूनच मग कोणत्याही बाबतीत अति झालं आणि हसू आलं, अशीच स्थिती येते.

पुण्यात १५ दिवसांत सरकारी पोर्टलवर कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या २४१ खासगी रुग्णालयांची वाढ होते आणि त्याची माहिती सरकारी यंत्रणेकडे १५ दिवसांपूर्वीपर्यंत नसते, हे सरकारी यंत्रणेने मान्यही केले आहे. त्यामुळे आवश्यक सरकारी यंत्रणेकडून तशी परवानगी न घेता उपचार केलेल्या या रुग्णालयांवर आणि त्यांना तशी मुभा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार, हा खरा प्रश्न आहे.

रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्याच्या बातम्या कोल्हापूर, श्रीरामपूरपासून अनेक शहरांतून अजूनही येताहेत. याचा अर्थ रेमडेसिवीरचे उत्पादक आणि विक्रीसाखळी यांच्यासंदर्भात सरकार फारसे काही करू शकलेले नाही, याचीही खात्री पटते. त्यामुळे लॉकडाऊनचे कडक उपाय, कडक निर्बंध, थोडे निर्बंध थोडे अर्थचक्र सुरू या साऱ्या `किंबहुना’ उपायांनाही जनता विटली आहे. नेतृत्वाचा एक गुण असतो तो खंबीरपणे निर्णय घेण्याचा आणि घेतलेला निर्णय अमलात आणण्याचा. तो गुणच महाराष्ट्रातून गायब झालाय; कारण तिरपागडं सरकार, तीन दिशेला तीन तोंडे, रोजच्या रोज कुणीही उठून काहीही बोलतोय आणि जनता बिचारी `काढलंय तिकीट तर बघा रोजच्या रोज तोच खेळ’, अशी हताश अवस्थेत, हेच चित्र सध्या महाराष्ट्रात दिसतंय.

थोडा दिलासाही…
पुणे जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी दिवसभरात दाखल होणाऱ्या नव्या करोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्ती आहे, ही त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट आहे. पुणे शहरातही मंगळवारी नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्ती आहे. दिलासा देणारं आणखी एक उदाहरण म्हणजे धायरीतल्या एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात कोरोनावर उपचार सुरू असलेले ७० वर्षांचे पोपट कुंभार हे बरे झालेत आणि अतिदक्षता विभागात बासरीवादन करून रुग्णालयाच्या टिपिकल वासात, उपकरणांच्या आवाजात वेगळाच जीवनसूर पसरवत आहेत. त्यांच्यामुळे इतरही रुग्णांना कदाचित उत्साह येईल आणि तेही कोरोनावर मात करू शकतील.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button