गोंधळलेले सरकार : आधी वडेट्टीवारांकडून अनलॉकची घोषणा; नंतर मुख्यमंत्री कार्यालयाचा नकार

CM Uddhav Thackeray - Vijay Wadettiwar

मुंबई : राज्यातील कोरोनाची (Corona) दुसरी लाट काहीशी ओसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांची विभागणी पाच टप्प्यांत करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांच्या आत व्यापलेले असेल, त्या जिल्ह्यात उद्यापासून पूर्णपणे अनलॉक होईल, अशी मोठी घोषणा वडेट्टीवार यांनी केली. मात्र वडेट्टीवारांनी घोषणा केल्याच्या काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाने असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर वडेट्टीवार यांनीही घूमजाव करत अनलॉकबाबत मुख्यमंत्री निर्णय जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) गोंधळलेले सरकार म्हणत टीका केली आहे.

राज्य सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यात राज्यातील निर्बंध अद्याप हटवले नाहीत. नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन तूर्तास कायम असल्याचंच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील, असं राज्य सरकारनं सांगितलं आहे.

वडेट्टीवारांचे घूमजाव
राज्य सरकारमध्ये कुठलीही गफलत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत अनलॉकच्या (Unlock) पाच टप्प्यांत मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. एचडीएमएने पाच लेव्हल ठरवल्या, त्याला मान्यता मिळाली आहे. लॉकडाऊन लादणे हे सरकारचे काम किंवा जबाबदारी नाही. ज्या भागातील जनतेने सहकार्य केले त्या भागातील लॉकडाऊन (Lockdown) कमी करायचा हे धोरण ठरवले. ऑक्सिजन बेड, पॉझिटिव्हिटी रेट यावरून पाच स्टेप ठरवल्या, टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचं असं ठरलं, तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र अंतिम आदेश मुख्यमंत्री घेतील, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button