नवतंत्रज्ञान आणि मातृभक्तीचा संगम…

Shailendra Paranjapeडॉ. रघुनाथ माशेलकर (Dr. Raghunath Mashelkar), राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव गाजवणारे संशोधक. देशभरातल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनाच्या सर्व प्रयोगशाळांचे महासंचालक म्हणून काम केलेले संशोधक, अद्ययावत मोटारींसाठीचे अटो फ्युएल धोरण निश्चित करण्यासाठीच्या समितीच्या कामातून ते धोरण तयार करणारे द्रष्टे प्रशासक, एनसीएल किंवा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेला केवळ देशातच नव्हे तर जगात श्रेष्ठ संशोधनसंस्थेमधे रूपांतरित करणारे नेतृत्व देणारे संचालक, भारतरत्न वगळता बाकीच्या नागरी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरवण्यात आलेले भारतमातेचे सुपुत्र.

वयाची पंचाहत्तरी ओलांडून (जन्म १ जानेवारी १९४३) ऐंशीच्या घरात असलेले माशेलकर सर आजही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने काम करतात. देशभरात पेटंट साक्षरता मोहीम आणण्यात आणि हळदीच्या जखम बरी करम्याच्या गुणधर्माचं पेटंट भारताच्या हाती ठेवण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलंय. मुळात त्यांचं फिल्ड म्हणजे केमिकल इंजिनियरिंग (Chemical engineering) आणि संबंधित संशोधनामुळे उपयोजित तंत्रज्ञानाचे. त्यामुळे त्यांना मूलभूत संशोधनाचे नोबेल मिळू शकत नाही पण तंत्रज्ञानातले नोबेल समजले जाणारे पुरस्कार त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच मिळवले आहेत. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचेही माशेलकर सर फेलो आहेत.

या साऱ्या ओळखींच्या पलीकडे माशेलकर सरांची मातृभक्त ही ओळख त्यांच्या जवळच्या स्नेहीजनांना माहीत आहे. पितृछत्र अगदी लहानपणी हरपल्यानंतर अक्षरशः हाडाची काडं करून आपल्या मुलाला शिक्षण देणारी आई माशेलकर सरांना लाभली, केवळ पदवीपर्यंत न थांबता त्याच्यापुढही काहीतरी शिक्षण असेलच ना, असं विचारत उच्च शिक्षण घ्यायला लावून आणखी पुढं आणखी पुढं, ही वृत्ती जोपासायला लावणारी ही आई माशेलकर सरांच्या इनोव्हेशन आणि पेटंट चळवळीला कारणीभूत होतीच. सरांकडून काही वेळा त्याचे उल्लेखही होत असत.

आईच्या निधनानंतर सरांनी तिच्या नावानं अंजनी माशेलकर पुरस्कार सुरू केले. यंदाचे या पुस्कारांचे दहावे वर्ष. यंदाचे अंजनी माशेलकर यांच्या नावाने इन्क्लुझिव्ह इनोव्हेशनसाठी दिले जाणारे पुरस्कार मंगळवारी देण्यात आले.
प्रज्ञावंत तरुणांची भारतात कमी नाही पण त्यांच्या गुणवत्तेचा प्रज्ञेचा फायदा भारताला व्हावा, हे माशेलकर सरांना मनापासून वाटते. ते स्वतःही परदेशातल्या संधी सोडून मायदेशी परतलेल्या संशोधकांपैकी एक आहेत. त्यामुळेच तरुणांनी केलेल्या इनोव्हेटिव्ह संशोधनांच्या ते शोधात असतातच आणि आईच्या नावाने पुरस्कार देऊन एक प्रकारे देशकार्यालाच हातभार लावीत आहेत.

सेव्हमॉम आणि डोझी या दोन स्टार्ट अप्सना यंदाचे पुस्कार देण्यात आले. सेन्थिल मुरुगेसन यांनी मदुराई येथे सुरू केलेल्या जियोव्हियो हेल्थकेअर या स्टार्टअपनं सेव्हमॉम हे इनोव्हेशन प्रत्यक्षात आणलंय. गरोदर मातांची एक हजार रुपयात एक हजार दिवस काळजी घेण्याची त्यात सोय आहे. गरोदर माता आणि नवजात अर्भक यांच्या सुदूर अंतरावरूनही १५ प्रकारच्या वैद्यकीय आरोग्यविषयक चाचण्या या तंत्रज्ञानाद्वारे घेता येतात. सेन्थिल यांना २०१६मधे आपल्या बहिणीच्या गरोदरपणाच्या वेळी तिच्या आरोग्याबद्दल काळजी वाटायची आणि त्यातून या उपकरणाचा शोध लागला. दक्षिणेकडच्या राज्यातल्या शंभर गावांमधे हजारो महिलांना त्याचा उपयोग झालाय म्हणूनच माशेलकर सरांनी या सेव्हमॉमला आपल्या आईच्या नावाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिलाय.

डोझी हे इनोव्हेशन अक्षरशः दोन मिनिटात प्रथामिक आरोग्य केंद्रातल्या साध्या खाटेला सेमी आयसीयू बेडमधे रूपांतरित करू शकते. मुदित दंडवते आणि गौरव परचानी यांच्या टर्टल शेल टेक्नॉलॉजीजनं हे साध्य केलं आहे. मुदितनं आयआयटी मुंबईतून शिक्षण गेतलं असून अटोमोबाईल क्षेत्रात म्हणजेच वाहन उद्योगात जर्मनीतही काम केलंय. सेन्सर्स किंवा संवेदकांद्वारे वाहनांच्या व्हायब्रेशनच्या अभ्यासातून वाहनांच्या आरोग्याती निगा किंवा रोगाचे निदान होते तर मग हेच माणसाबाबतही का लागू होऊ नये…

यातूनच डोझीचा जन्म झालाय. करोनाच्या काळात रुग्णाला आवश्यक असलेली आयसीयू सारखी सुविधा आणि खाटांची अनुपलब्धता, याच्या बातम्या आपण सर्वांनीच पाहिल्या, वाचल्यात. त्यामुळेच साध्या काटेचं सेमी आयसीयूत रूपांतर करणाऱ्या डोझीसाठी मुदितनं अंजनी माशेलकर मानाचा पुरस्कार स्वीकारलाय.

हे पुरस्कार म्हणजे भारताच्या उज्ज्ल भविष्याच्या दिशेने होणाऱ्या प्रवासात नवतंत्रज्ञान आणि त्याद्वारे आत्मनिर्भरतेची वाटचाल प्रशस्त करणारे आहेत. नवतंत्रज्ञानाचा संदेश देतानाच मातृभक्तीचाही संदेश माशेलकर सर नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवत आहेत. त्यांना त्यांच्या कामासाठी सलाम.