‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे ‘भारत बंद’साठी अनेक राज्यांत दौरे

Bharat Bandh

ठाणे : या वर्षाच्या अर्थसंकल्पात वस्तू आणि सेवा करसंदर्भात केलेल्या अटी व तरतुदीमुळे व्यापारी संतापले आहेत. याविरोधात देशातील सुमारे ४० हजारांहून जास्त विविध व्यापारी संघटनांनी आणि कॅटने २६ फेब्रुवारीला ‘भारत बंद’ची (Bharat Band) घोषणा केली आहे. त्यात सहभागी होण्यासाठी ठाणे, मुंबईसह राज्यातील व्यापारी तयारीला लागले आहेत, असे कॅटचे ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले. ग्राहकांसह व्यापाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी कॅटने ‘भारत बंद’ घोषित केले आहे.

राज्यभरातील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे, असे ठक्कर यांनी सांगितले. भारत बंद करण्यासाठी कॅटचे अधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. यासाठी कॅटच्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी राज्यांत दौरे सुरू केले आहे, असेही ठक्कर यांनी सांगितले. या बंदसाठी कर सल्लागार, सनदी लेखापाल, विविध आस्थपनांचे सचिव, लघु उद्योग, पेट्रोल पंप, थेट विक्री केंद्र, फेरीवाले, चित्रपटाशी संबंधित उद्योग, महिला संघटनांच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांशी संपर्क साधत आहे. या सर्व ‘भारत बंद’ला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

याशिवाय ऑनलाईन विक्रेते, व्यापार संबंधित संघटनांनाही ‘भारत बंद’ करण्यासाठी कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल प्रयत्न करीत आहेत, असेदेखील ठक्कर यांनी स्पष्ट केले . कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीयांकडे दिल्ली आणि यूपीची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रवीण खंडेलवाल महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान आणि अंदमान निकोबार या राज्यांचा दौरा करणार आहेत. ‘भारत बंद’साठी कॅटचे चेअरमन महेंद्र शहा आणि उपाध्यक्ष घनश्याम भाटी हे दक्षिणेतील राज्यांना भेट देणार आहेत. हे सर्व पदाधिकारी १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान संबंधित राज्यांना भेट देणार आणि ‘भारत बंद’ला प्रतिसाद मिळवण्यासाठी जनसामान्यांत वस्तू आणि सेवा करातील अटींविषयी जागृत करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER