झोपडपट्ट्यांमधील मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गल्ली आर्ट स्टुडीओ’ ची संकल्पना!

galli art studio

ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गल्ली आर्ट स्टुडीओ’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार झोपडपट्ट्यांमधील मुलांना विविध संस्थांच्या माध्यमातून नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभेपुढे प्रशासनाने अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे. या प्रस्तावामुळे झोपडपट्ट्यांमधील मुलांच्या उपजत कलागुणांना वाव मिळून त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २३ लाखांच्या पुढे गेल्याचे बोलले जात आहे. मात्र, नव्याने जनगणना झालेली नसल्यामुळे नेमकी लोकसंख्या किती हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. असे असले तरी ठाणे महापालिका क्षेत्रात २०११ मध्ये जनगणना करण्यात आली होती. त्यानुसार शहराची लोकसंख्या १८ लाख इतकी आहे. शहरातील सुमारे ५२ टक्के नागरिक हे झोपडपट्टी भागात राहत असून त्यामध्ये १८ वर्षाखालील मुलांची संख्या १८ हजार इतकी आहे.

ही बातमी पण वाचा : भिवंडीत पिसाळलेला कुत्रा चावल्याने सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; दोन मुले जखमी

त्यापैकी बहुतांश मुले महापालिका शाळेत शिक्षण घेतात. मात्र, त्यांच्यातील उपजत कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नसते. त्यामुळे कलागुण असतानाही ते मागे पडतात. नेमकी हि बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या समाज कल्याण विकास विभागाने अशा मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी ‘गल्ली आर्ट स्टुडीओ’च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘गल्ली आर्ट स्टुडीओ’च्या माध्यमातून १८ वर्षाखालील मुलांना नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार आहे. सहा ते आठ महिने इतका प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण देणाºया संस्थांची निविदा प्रक्रियेद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. या संस्था झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुलांमधील अंगभूत कलागुण ओळखून त्यांची प्रशिक्षणासाठी निवड करणार आहेत. आवश्यकता वाटल्यास ते मुलांना समुपदेशन करणार आहेत. या मुलांना प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन, नियंत्रण, मुल्यमापन, संकलन करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समितीनिहाय ‘गल्ली आर्ट स्टुडीओ’ ची निर्मिती केली जाणार आहे. ‘गल्ली आर्ट स्टुडीओ’च्या माध्यमातून मुलांना नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार आहे. त्यासाठी महापालिका शाळेची जागा शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. नृत्य, अभिनयस आणि संगीत यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.