पीडित मुलगी व आरोपीच्या तडजोडीने ‘पॉक्सो’चा गुन्हा रद्द करता येणार नाही

Maharashtra Today
  • दिल्ली हायकोर्ट: तसे करणे कायद्याच्या मूळ हेतूच्या विरुद्ध

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक (victim girl))अत्याचाराचा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो कायदा) नोंदविलेला गुन्हा, ती मुलगी सज्ञान झाल्यावर तिच्यात आणि आरोपीमध्ये तडजोड झाली या कारणाने रद्द केला जाऊ शकत नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिला आहे.

त्यावेळी इयत्ता १० वीत शिकत असलेल्या दिल्लीतील एका मुलीच्या फिर्यादीवरून तिचाच लांबचा नातेवाईक असलेल्या दिनेश शर्मा व त्याच्या काही मित्रांविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा सन २०१८ मध्ये नोंदविला गेला होता. आता ती मुलगी सज्ञान झाल्यावर ती, तिची आई व आरोपींमध्ये तडजोड झाली. हे कारण देऊन त्यांनी मुलीच्या तक्रारीवरून नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली. ती फेटाळताना न्या. सुब्रह्मण्यम प्रसाद यांनी हा निकाल दिला.

न्यायालयाने म्हटले की, जे गुन्हे तडजोडीने मिटविले जाऊ शकत नाहीत असे गुन्हेही, सबळ कारण असेल तर, रद्द करण्याचा अधिकार दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अन्वये उच्च  न्यायालयास जरूर आहे. पण हा अधिकार अपवादाने व खूप काळजीपूर्वक वापरायचा अधिकार आहे.

न्या. प्रसाद यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांचे दाखले देत असे म्हटले की, खून, बलात्कार, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे हे व्यक्तिविरुद्ध घडत असले तरी त्यांचा समाजावर व्यापक परिणाम होत असतो. त्यामुळे उच्च न्यायालयांनी कलम ४८२ चा अधिकार वापरून, आरोपी व फिर्यादीमध्ये तडतोड झाली तरी, असे गुन्हे रद्द करू नये, असा सुप्रस्थापित पायंडा पडला आहे.या पार्श्वभूमीवर ‘पॉक्सो’चा गुन्हा तर मुळीच रद्द करता येणार नाही. कारण बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात प्रस्थापित कायदे तोकडे पडतात हे पाहून मुद्दाम ‘पॉक्सो’हा कडक कायदा करण्यात आला आहे. आरोपी व फिर्यादी यांच्यात तडजोड झाली म्हणून न्यायालयांनी ‘पॉॉक्सो’चे गुन्हे रद्द करण्यास सुरुवात केली तर हा कायदा करण्यामागच्या मूळ उद्देशलाच हरताळ फासला जाईल.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button