उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची भिंत तोडली!

Uddhav Thackeray

उस्मानाबाद : येत्या 21 ऑक्टोबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. आठवड्यातले प्रचाराचे शेवटचे सात दिवस नेत्यांकडे प्रचारासाठी शिल्लक आहे. त्यामुळे पक्षातील बड्या नेत्यांनीही प्रचारसभांचा धडाका सुरु केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या आज तब्बल सात सभा आहेत. मात्र, उस्मानाबादमध्ये प्रचारसभेसाठी शिवसेनेच्या नेत्यांनी शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे.

ही बातमी पण वाचा:- मी लढणाऱ्या बापाचा लढणारा मुलगा आहे- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचार सभेसाठी जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत दोन ठिकाणी तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळेच्या प्रांगणात सभेची परवानगी देताना इमारतीची काळजी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. मात्र शिवसेना नेत्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. दरम्यान, आजच्या सभेमुळे शाळेतल्या परीक्षेचं वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे.

सध्या या शाळेत सहामाही परीक्षा सुरु आहे. आज पाचवी ते आठवी इयत्तेची चाचणी परीक्षा आहे. तर नववी आणि दहावीचा, गणित, विज्ञान आणि हिंदी विषयाचे पेपर आहेत. प्रशासनाने दबावापोटी परीक्षेचं वेळापत्रक बदलण्यास भाग पाडलं, तरीही परीक्षेची वेळ आणि सभेची वेळही एकच आहे. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पैसे वाचवण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन केलं आहे. परीक्षा हॉल आणि उद्धव ठाकरेंचं सभास्थळ यात अवघं दहा फुटांचं अंतर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे उद्धव ठाकरे स्थानिक कार्यकर्त्यांना दम देतील का आणि विद्यार्थीहित लक्षात घेऊन या ठिकाणची सभा रद्द करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.