त्या कॉम्प्लिमेंटने यशोमान झाला खल्लास

Yashoman Apte

कोणत्याही कलाकारासाठी त्याच्या चाहत्यांकडून दिलखुलासपणे मिळणारी दाद ही कलाकारासाठी खूप महत्त्वाची असते. कलाकार नेहमीच अशा भूमिकेच्या शोधात असतात की ती भूमिका त्यांना चाहत्यांचे भरभरून प्रेम देईल. अचानकपणे एखादा चाहता समोर येतो आणि त्याच्याकडून सहजपणे एखादी कॉम्प्लिमेंट मिळते याहून दुसरं सुख कलाकारासाठी काय असू शकतं ? सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला आणि छोट्या पडद्यावरचा चॉकलेट हिरो अभिनेता यशोमान आपटे (Yashoman Apte) याला काही दिवसांपूर्वीच एका चाहत्याकडून अशी कॉम्प्लिमेंट मिळाली की ते ऐकून यशोमान खल्लास या पोझमध्ये पोहोचला. काय होती ती कॉम्प्लिमेंट ? आणि ती कॉम्प्लिमेंट ऐकल्यावर यशोमानच्या चेहऱ्यावर गुलाबी छोटा का आल्या ? हे त्याने शेअर केलं आहे त्याच्या चाहत्यांनासाठी ..

फुलपाखरू या पहिल्याच मालिकेने यशोमन आपटेला घराघरातच नव्हे तर तरुणींच्या मनामनापर्यंत पोहोचवलं. या मालिकेत त्याच्या तोंडी एक संवाद होता. जेव्हा जेव्हा तो या मालिकेची नायिका वैदेहीला पाहतो आणि तिच्याबरोबर काही रोमांटिक गोष्टी करतो तेव्हा वैदही लाजत असते. आणि ती लाजल्यानंतर तो नेहमी खल्लास असे एक वाक्य बोलत असतो. अभिनयाबरोबरच त्याचा खल्लास हा शब्ददेखील प्रचंड लोकप्रिय झाला होता. फुलपाखरू मालिका संपल्यानंतर कित्येक दिवस यशोमानच्या तोंडून खल्लास हे शब्द ऐकण्यासाठी त्याचे चाहते तो जिथे भेटेल तिथे त्याला गाठून ते वाक्य म्हणायला लावायचे. एका चाहत्याने यशोमानना दिलेली पोचपावती ऐकून यशोमनवरच खल्लास होण्याची वेळ आली.

यशोमान सांगतो, फुलपाखरू मालिका संपल्यानंतर एकदा मी मार्केटमध्ये फिरत होतो. त्यावेळी माझ्यासमोर एक तरुण मुलगा सहजपण माझ्या समोर येऊन उभा राहिला. अर्थातच त्याने मला मानस याच माझ्या नावाने हाक मारली. फुलपाखरू मालिका हिट झाल्यामुळे मला रस्त्यावर फिरताना या गोष्टीची सवय झाली होती की कोणीही माझ्या समोर यायचं आणि मला मानस म्हणून हाक मारायचं. तशीच त्या मुलाने हाक मारली. माझ्यासोबत फोटो काढले. मी पण त्याच्याशी पाच मिनिटे गप्पा मारल्या. जाताना तो एकच वाक्य बोलला आणि ते वाक्य होतं “यशोमान, तू मुलींना वेड लावलं आहेस” . बस तो माझ्या समोर आला आणि माझ्यासोबत फोटो काढले आणि जाताना एकच वाक्य बोलून त्याने मला बाय केलं. त्याला दुसरं काही बोलायचं नव्हतं आणि काहीही सांगायचं नव्हतं. फुलपाखरू ही मालिका करत असताना मी अनेकदा ऐकलं होतं की माझी तरुण मुलींमध्ये खूप क्रेझ आहे. मला माझ्या सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजमध्ये सुद्धा तरुण मुलींच्या मेसेजची संख्या जास्त होती. अर्थात हे कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून मला खूप आवडायचं. मी एन्जॉय करायचो पण त्या मुलाने त्या दिवशी जी प्रतिक्रिया दिली की खरंच आजच्या तरुण मुलांच्या मनातली खरी प्रतिक्रिया होती असं मला वाटतं. मुलींना वेडं करणं म्हणजे काय असतं हे तरुण वयातील मुले आणि मुलीच समजू शकतात. प्रत्येकजण त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये त्या फेजमधून गेलेला असतो. प्रत्येकाच्या आयुष्यातला एक तरी कोपरा असा गुलाबी झालेला असतो. फुलपाखरू या मालिकेतील मानस ही व्यक्तिरेखा करत असताना मी नेहमी कॉलेजमध्ये जाणारे तरुण प्रेमाकडे कुठल्या दृष्टीने पाहत असतील हा विचार करूनच ती भूमिका निभावली होती. आणि त्याची पावती मला त्या मुलाने दिलेल्या कॉम्प्लिमेंटमधून मिळाली. आजपर्यंत अनेक कॉम्प्लिमेंट मिळाल्या. ज्या माझ्या अभिनय चांगला होता, गाणं चांगलं होतं असं सांगणाऱ्या होत्या. पण त्या मुलाने मुलींना मी वेड केले आहेस असं म्हणत दिलेली दाद माझ्यासाठी खूप गोड कॉमेंट होती.

सध्या यशोमान आपटे श्रीमंताघरची सून या मालिकेत अथर्व ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत फुलपाखरू आणि आनंदी हे जग सारे या त्याच्या दोन्ही मालिकेमध्ये त्याच्यासोबत असलेली अभिनेत्री रुपल नंद ही त्याची नायिका म्हणून काम करत आहे. या दोघांची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर असून अथर्व आणि अनन्या यांचं लग्नापर्यंत आलेले नातं टिकेल की नाही ही उत्सुकता या मालिकेने सध्यातरी निर्माण केली आहे. अभिनयासोबत यशोमान उत्तम गायक असून सिंगिंग स्टार या रियालिटी शो मध्ये त्याने बाजी मारली होती. यशोमानकडे गिटार वाजवण्याची कलादेखील आहे. त्याचं गाणं आणि गिटार वादन फुलपाखरू या मालिकेतही त्याच्या चाहत्यांना ऐकायला मिळालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER