शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण आधी पूर्ण करा; मनसेची मागणी

Bala Nandgaonkar - CM Uddhav Thackeray

मुंबई :- महाराष्ट्रातील असंख्य मुले दरवर्षी परदेशात उच्च शिक्षणासाठी जात असतात. साधारणपणे ऑगस्ट महिन्याच्या दुस-या आठवड्यात या मुलांचे परदेशात पोहचणे अपेक्षित असते. अनेक विद्यापीठांच्या अटीनुसार हे विद्यार्थी दूरचा प्रवास करून येणार असल्याने विद्यापीठात पोहचण्यापूर्वी या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार आतापर्यंत भारतात वापरात असलेल्या लसींपैकी फक्त कोविशिल्ड याच लसीला जागतिक स्तरावर मान्यता आहे. भारतातील लसीकरणाच्या नवीन नियमांनुसार लसीकरणासाठी कोविन-ॲपमध्ये नोंदणी करून स्लॉट बुक करणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ मे २०२१ पासून कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवडे म्हणजेच ३ ते ४ महिने इतके केले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यापूर्वी म्हणजेच ऑगस्ट महिन्यापूर्वी फक्त एकच डोस घेता येईल. तसेच जगातील अनेक देशांमध्ये कोविशिल्ड ही लस नसल्याने या मुलांचे लसीकरण पूर्ण होणार नाही.

त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना एफ-1 व्हिसा मिळाला आहे, अशा  विद्यार्थ्यांसाठी कोविन-ॲपमध्ये एक वेगळा गट तयार करून त्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना प्राध्यान्याने पहिला डोस द्यावा. तसेच परदेशात असलेल्या संपूर्ण लसीकरणाच्या व्याख्येनुसार दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक असल्याने या विद्यार्थ्यांना ऑगस्टमध्ये परदेशात जाण्यापूर्वी दुसरा डोस जुलै महिन्यात देण्यात यावा म्हणजे त्यांचे परदेशातील नियमांनुसार लसीकरण पूर्ण होईल.

परदेशात जाणारे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट घेतात. विविध परीक्षा देऊन आपला वेळ व पैसा खर्च करून शिक्षणासाठी परदेशात प्रवेश मिळवतात. अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्जही काढलेली आहेत. गेल्या वर्षीदेखील अनेक विद्यार्थी प्रदेशात जाऊ शकलेले नाहीत. महाराष्ट्र शासनाने परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्याच्या या अडचणींचा प्राधान्याने विचार करून या विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरणाचे दोनही डोस जुलै महिन्यात पूर्ण करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी नांदगावकर यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button